आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा हे ३१ डिसेंबरला अपघातमुक्त रात्र करण्यासाठी आसाम पोलीस कर्मचार्यांसह गुवाहाटीच्या रस्त्यावर उतरले होते. शर्मा यांनी नवीन वर्षाची संध्याकाळ ही गुवाहाटीच्या रस्त्यांवर मद्यपान करून वाहन चालवण्याच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी गस्त घालत घालवली. आसाममध्ये मद्यपान करून वाहन चालवल्याने होणारे मृत्यू होऊ नयेत या मोहिमेचा एक भाग म्हणून वाहनांची तपासणी करताना मुख्यमंत्री वाहतूक पोलिस अधिकाऱ्यांसोबत दिसले.
मुख्यमंत्र्यांचे तपासणीदरम्याचने व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ज्यामध्ये ते पोलीस कर्मचार्यांसोबत उभा राहून वाहनांची तपासणी करत आहेत. “रात्रभर गुवाहाटीच्या रस्त्यावर होतो. ३१ डिसेंबरला अपघातमुक्त रात्र बनवण्याच्या आमच्या आवाहनाला मिळालेला उदंड प्रतिसाद पाहून आनंदित झालो. गुवाहाटीच्या लोकांना त्यांच्या सर्वोत्तम कामगिरीबद्दल अभिनंदन. आपण २०२२ मधील प्रत्येक दिवस आणि रात्र अपघातमुक्त करण्यासाठी आमचे प्रयत्न चालू ठेवूया,” अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांनी दिली.
शर्मा यांनी शनिवारी सांगितले की २०२१च्या शेवटच्या दिवशी अपघात टाळण्यासाठी सुरक्षा नियम लागू करण्यासाठी विशेष मोहिमेनंतर नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला राज्यात कोणताही रस्ता अपघात झाला नाही.
अपघातमुक्त नववर्षाच्या पूर्वसंध्येला या उपक्रमाचे नेतृत्व करणारे सरमा शुक्रवारी रात्री गुवाहाटीच्या रस्त्यावर उतरून वाहतूक नियमांचे उल्लंघन रोखण्यासाठी कर्तव्यावर असलेल्या पोलीस आणि वाहतूक विभागाच्या कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवले असेही ते म्हणाले.
शर्मा यांनी गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात नवीन वर्षाच्या पहिल्या पूर्वसंध्येपूर्वी दारू पिऊन गाडी चालवण्याविरोधात मोहीम उघडली होती. दारू पिऊन वाहन चालवू नका, असे आवाहन त्यांनी केले होते. “नवीन वर्ष जवळ येत असताना, सावधगिरीने वाहन चालवून अपघातमुक्त वातावरण निर्माण करण्याचे आवाहन मी जनतेला करतो,” असे शर्मा यांनी म्हटले होते.
दरम्यान, गेल्या वर्षी ३० नोव्हेंबरपर्यंत ६,७४५ रस्ते अपघातांमध्ये २,७५६ लोकांचा मृत्यू झाला होता. यामध्ये ५२५२ लोक जखमी झाले. म्हणजेच दररोज सरासरी आठ जणांचा मृत्यू झाला. ३१ डिसेंबर २०२० आणि १ जानेवारी २०२१ या दोन दिवसात आसाममध्ये रस्ते अपघातात २९ जणांचा मृत्यू झाला होता.