हरिद्वार (उत्तराखंड) - हरिद्वार येथे आयोजित 'धर्म संसद' मध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल प्रक्षोभक वक्तव्य केल्याप्रकरणाची ( Objectionable Remarks on Mahatma Gandhi ) चौकशी करण्यासाठी पाच सदस्यीय विशेष तपास पथक स्थापन करण्यात ( Haridwar hate speech case ) आले आहे. ही माहिती गढवालचे उपमहानिरीक्षक करण सिंह नागन्याल यांनी दिली. दोषी आढळलेल्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही ते म्हणाले.
धर्म संसद द्वेषयुक्त भाषण प्रकरणात एफआयआरमध्ये सागर सिंधू महाराज आणि यति नरसिंघानंद गिरी ही आणखी दोन नावे जोडली गेली आहेत. धर्म दास, अन्नपूर्णा, वसीम रिझवी उर्फ जितेंद्र त्यागी आणि इतर काही जणांवर भारतीय दंड संहितेच्या कलम 153A अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याशिवाय, उत्तराखंड पोलिसांनी कार्यक्रमात केलेल्या विधानांशी संबंधित आयपीसी कलम 153A (धर्माच्या आधारावर वेगवेगळ्या गटांमध्ये शत्रुत्व वाढवणे) अंतर्गत उत्तर प्रदेश सेंट्रल शिया वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष रिझवी यांच्या विरोधात एफआयआर नोंदवला. रिझवी यांनी गेल्या महिन्यात हिंदू धर्म स्वीकारला आहे.
काय प्रकरण ?
छत्तीसगडची राजधानी रायपूर येथील ‘धर्म संसद’मध्ये कालीचरण यांनी नथुराम गोडसेच्या फोटोला हात जोडून महात्मा गांधींवर प्रक्षोभक ( Kalicharan Controversial Statement ) भाष्य केले होते. महात्मा गांधींनी काँग्रेसमध्ये घराणेशाही वाढवण्याचे काम केले. पंडित नेहरूंऐवजी सरदार पटेल यांच्याकडे सत्ता सोपवली असती तर देश अमेरिकेच्या पुढे गेला असता, असे ते म्हणाले. महात्मा गांधी हे काँग्रेसमधील घराणेशाहीचे जनक आहेत. ते राष्ट्रवादाचे जनक नाहीत, म्हणून ते त्यांना राष्ट्रपिता मानत नाही, असेही ते म्हणाले. या भाषणावरून त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल झाला होता. एफआयआर दाखल झाल्यानंतर त्यांनी आणखी एक वादग्रस्त व्हिडिओ शेअर करत आगीत तेल ओतण्याचे काम केले. गांधींना शिव्यांच्या लाखोल्या वाहिल्याचा मला पश्चाताप नाही. मी गांधींचा तिरस्कार करतो. गांधींनी हिंदूंसाठी काय केले?, असे त्यांनी म्हटलं होतं. यानंतर कालीचरण महाराजाविरोधात संतापाची लाट उसळली आहे.