कार्डेलिया क्रूझवर छापेमारी करून अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक केल्यानंतर एनसीबी अधिकारी समीर वानखेडे सर्वांच्याच परिचयाचे झाले आहेत. त्यानंतर समीर वानखेडे आणि नवाब मलिक यांचे आरोप प्रत्यारोप देखील चांगलेच गाजले. दोघांमधील कलगीतुरा अजूनही संपलेला नाही. परंतु यावेळी समीर वानखेडे नवाब मलिकांमुळे नाही, तर त्यांच्या एका कामगिरीमुळे पुन्हा चर्चेत आले आहेत.
समीर वानखेडे यांनी आणखी एक कारवाई केली आहे. नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (NCB) विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखालील टीमने गोव्यात ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश केला. एनसीबीच्या निवेदनानुसार, गोव्यातील सिओलीम येथून दोन महिला ड्रग्ज तस्करांनाही अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून विविध प्रकारचे प्रतिबंधित ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत.
एका गुप्त माहितीवर कारवाई करत, मुंबई आणि गोवा झोनच्या एनसीबी पथकांनी घटनास्थळावरून १.३० किलो गांजा आणि ४९ टॅबलेट,२५ ग्रॅम अॅम्फेटामाइन, २.२ ग्रॅम कोकेन, १ ग्रॅम एमडीएमए पावडर आणि एक वाहन जप्त केले. प्राथमिक तपासानुसार, एक महिला एमडीएमए आणि इतर औषधे पुरवत होती. ती ड्रग सिंडिकेट चालवणाऱ्या एका नायजेरियन महिलेसाठी काम करत होती, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
“आतापर्यंतच्या तपासात असे समोर आले आहे की गोव्यातील एक महिला आरोपी ड्रग सिंडिकेट चालवणाऱ्या इतर नायजेरियन महिला आरोपींच्या वतीने एमडीएमए आणि इतर ड्रग्स पुरवत असे. सिंडिकेटमध्ये आणखी काही सदस्य असून परदेशी नागरिकांचाही समावेश आहे, त्यांना पकडण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तसेच आरोपी महिलांची स्थानिक न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे,” असे निवेदनात म्हटले आहे.