तालिबानच्या अधिकाऱ्यांनी रविवारी तीन हजार लीटर दारु नष्ट केलीय. तालिबान्यांनी ही दारु काबूलमधील कालव्यामध्ये सोडून दिली. अफगाणिस्तानमधील मद्यविक्रीवर चाप लावण्याच्या हेतून ही कारवाई करण्यात आल्याची माहिती देण्यात येत आहे.
अफगाणिस्तानमधील गुप्तचर यंत्रणेचे महानिर्देशक म्हणजेच जीडीआयकडून या कारवाईचा एक व्हिडीओ जारी करण्यात आलाय. या व्हिडीओमध्ये कर्मचारी दारुचे बॅलर्स कालव्यामध्ये ओतत असताना दिसतायत. ही दारु काबूलमधील छापेमारीत जप्त करण्यात आलेली दारु असल्याचं डेली पाकिस्तानने म्हटलं आहे.
गुप्तचर यंत्रणेकडून ट्विटरवर पोस्ट करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये तालिबानी अधिकाऱ्यांनी व्हिडीओमध्ये मुस्लिमांनी दारु बनवण्यापासून आणि वितरित करण्यापासून दूर रहावं असं म्हटलंय. “दारु बनवणे आणि वितरीत करण्यापासून मुस्लिमांनी दूर राहिला पाहिजे. हा इशारा त्यांनी गांभीर्याने घ्यावा,” असं अधिकाऱ्यांनी म्हटलंय.
छापेमारी नक्की कधी करण्यात आली आणि दारु कधी नष्ट केली गेली याबद्दलची माहिती देण्यात आलेली नाही. मात्र या प्रकरणासंदर्भात जारी करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये तीन मद्य वितरकांना या प्रकरणामध्ये अटक केलीय.
इस्लामिक विचारसणीनुसार कारभार चालवणाऱ्या तालिबानचा मद्यनिर्मिती, मद्य वितरण आणि मद्य प्राशन करण्याला तालिबान्यांचा विरोध आहे. दारु पिणे हे अपवित्र, अयोग्य आणि इस्लामविरोधी आहे असं तालिबान्यांचं म्हणणं आहे.