पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची माजी पत्नी रेहम खान यांच्या गाडीवर काही अज्ञातांनी गोळीबार केला. रेहम खान यांनी ट्विट करून या हल्ल्याची माहिती दिली. या हल्ल्यानंतर रेहम यांनी पाकिस्तान सरकारवर निशाणा साधला आहे आणि हा इम्रान खानचा नवा पाकिस्तान आहे का? असा सवाल केला आहे. त्याचवेळी त्यांनी पाकिस्तानला भ्याड, गुंड आणि लोभी लोकांचा देश म्हटले. रेहम खान आपल्या पुतण्याच्या लग्नातून परतत असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला.
“मी माझ्या पुतण्याच्या लग्नातून परतत असताना काही लोकांनी माझ्या कारवर गोळीबार केला आणि दोन मोटारसायकल स्वारांनी बंदुकीच्या जोरावर माझी कार थांबवण्याचा प्रयत्न केला. कारमध्ये माझा सुरक्षा रक्षक आणि ड्रायव्हर होता. हा इम्रान खान यांचा नवीन पाकिस्तान आहे का? भ्याड, लुटारू आणि लोभी लोकांच्या देशात आपले स्वागत आहे,” असे रेहम खान यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
“मला सामान्य पाकिस्तानी नागरिकांप्रमाणे पाकिस्तानात जगायचे आणि मरायचे आहे. माझ्यावर भ्याड हल्ला असो की कायदा आणि सुव्यवस्था रस्त्याच्या मधोमध त्याच्या चिंधड्या उडवल्या जात आहेत. याची जबाबदारी या तथाकथित सरकारने घ्यावी. मी माझ्या देशासाठी गोळी खाण्यासही तयार आहे,” असे रेहम यांनी म्हटले आहे. रेहम खान यांची इम्रान खानवर उघडपणे टीका करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही त्यांनी अनेक मुद्द्यांवरून त्यांचे माजी पती इम्रान खान यांना घेरले आहे.
यापूर्वी पाकिस्तानातील वाढत्या बलात्काराच्या घटनांमध्ये महिलांच्या कपड्यांबाबत इम्रान खान यांचे वादग्रस्त वक्तव्य रेहम खान यांनी ढोंगी असल्याचे म्हटले होते. रेहम खान यांनी इम्रान खान यांना बलात्कारावर नेहमीच माफी मागतात असे म्हटले आणि पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी महिलांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल माफी मागावी अशी मागणी केली. याआधी इम्रान खानची दुसरी पत्नी जेमिमा गोल्डस्मिथ यांनीही कुराणाचा उल्लेख करून इम्रान खान यांना खडसावले होते.
ब्रिटिश-पाकिस्तानी वंशाच्या पत्रकार आणि माजी टीव्ही अँकर रेहम खान यांनी २०१४ मध्ये इम्रान खान यांच्यासोबत लग्न केले होते. दोघांचे लग्न केवळ १० महिने टिकले. रेहम या माजी पतीच्या स्पष्ट टीकाकार म्हणून ओळखल्या जातात. २०१९ मध्ये पुलवामा हल्ल्यानंतर रेहम खान यांनी, इम्रान खान पाकिस्तानच्या लष्कराची बाहुली आहेत असे म्हटले होते.