बिहारमधील नालंदा मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये ८७ डॉक्टरांना करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. पाटण्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी या वृत्ताला दुजोरा दिल्याचं मिंटने दिलेल्या वृत्तात म्हटलंय. जिल्हाधिकारी चंद्रशेखर सिंह यांनी सोमवारी सकाळी यासंदर्भातील माहिती देताना करोनाचा संसर्ग झालेल्या डॉक्टरांपैकी काहींना कोणतीही लक्षणं दिसत नसली तरी काहींना सौम्य लक्षणांचा त्रास होत असल्याचं म्हटलंय. या सर्व डॉक्टरांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे.
मागील आठवड्यामध्ये या कॉलेजमध्ये इंडियन मेडिकल असोसिएशनचा एक कार्यक्रम पार पडला होता. याच कार्यक्रमामधून डॉक्टरांना मोठ्या प्रमाणात करोनाचा संसर्ग झाल्याचं सांगण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते. यामध्ये मुख्यमंत्री नितिश कुमार यांचाही समावेश होता.
रविवारी पाटण्यातील एम्समधील दोन डॉक्टरांना करोनाचा संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं. रविवारी राज्यामध्ये करोनाचे एकूण ३५२ रुग्ण आढळून आले. शनिवारच्या आकडेवारीपेक्षा ही संख्या ७१ ने अधिक होती. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार सक्रीय रुग्णांची संख्या एक हजारांहून अधिक झाली असून सध्या राज्यामध्ये १ हजार ७४ जणांवर करोनाचे उपचार सुरु आहेत.
शुक्रवारी राज्यात २८१ तर शनिवारी १५८ करोना रुग्ण आढळून आले होते. मात्र सुदैवाने मागील चार दिवसांमध्ये बिहारमध्ये करोनामुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. बिहारमधील करोना मृतांचा आकडा हा १२ हजार ९६ इतका आहे.
करोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव पाटणा जिल्ह्यात झालाय. त्या खालोखाल गया जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढला असून तिथे ११० नवीन रुग्ण आढळून आलेत. राज्यातील सक्रीय रुग्णांपैकी पाटण्यात ५४४ तर गयामध्ये २७७ रुग्ण आहेत. म्हणजेच एकूण सक्रीय रुग्णसंख्येपैकी ८० टक्के रुग्ण या दोन जिल्ह्यांमध्ये आहेत.
करोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये करोना संसर्गामुळे सर्वाधिक डॉक्टरांचा मृत्यू झालेल्या राज्यांच्या यादीमध्ये बिहार हे अव्वल स्थानी असल्याचं इंडियन मेडिकल असोसिएशनने म्हटलं आहे. मागील वर्षी एप्रिल ते मे दरम्यान देशात करोनाची दुसरी लाट आली होती.