कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये करोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत असल्याने राज्य सरकारने पुन्हा निर्बंध लागू केले असून सोमवारपासून सर्व शिक्षण संस्था बंद ठेवल्या जाणार आहेत. सर्व कार्यालये ५० टक्के उपस्थितीसह सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे.
राज्याचे मुख्य सचिव एच. के. द्विवेदी यांनी रविवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, राज्यात रात्री १० वाजल्यापासून पहाटे ५ वाजेपर्यंत केवळ अत्यावश्यक सेवांना परवानगी असेल.
उपनगरी रेल्वे ५० टक्के प्रवासी क्षमतेने रात्री ७ वाजेपर्यंत चालविली जाईल. सर्व बाजार, शॉिपग मॉल ५० टक्के क्षमतेने रात्री १० वाजेपर्यंत खुले ठेवता येतील. बार आणि उपाहारगृहे ५० टक्के क्षमतेने रात्री १० पर्यंत सुरू ठेवता येतील.
राज्यातील सर्व पर्यटनस्थळे, प्राणिसंग्रहालये बंद ठेवली जाणार आहेत. त्याचबरोबर जलतरण तलाव, पार्लर, स्पा, वेलनेस सेंटर आणि व्यायामशाळाही बंद ठेवल्या जाणार आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.
सिनेमागृहे आणि नाटय़गृहे ५० टक्के आसन क्षमतेने सुरू ठेवता येतील.
सभा आणि परिषदा घेण्यासाठी जास्तीत जास्त २०० किंवा आसन क्षमतेच्या ५० टक्के यापेक्षा जी संख्या कमी असेल, तेवढय़ा लोकांना उपस्थित राहाता येईल. लग्नसमारंभासाठी जास्तीत जास्त ५० आणि अंत्यसंस्कारासाठी केवळ २० लोकांना उपस्थित राहाता येईल.
राज्यात शनिवारी करोनाचे ४५१२ रुग्ण नोंदले गेले. यापैकी २३९८ कोलकात्यातील आहेत.
विमान उड्डाणांवर निर्बंध
मुंबई आणि दिल्लीहून येणाऱ्या विमानांना आठवडय़ातून दोन वेळा परवानगी दिली जाईल. सध्या इंग्लंडहून येणाऱ्या कोणत्याही विमानास राज्यात उतरू दिले जाणार नाही, असे मुख्य सचिवांनी सांगितले.