चीनने २०२२ च्या पहिल्याच दिवशी गलवान येथे चिनी ध्वज फडकवत एक व्हिडिओ जारी केला आहे. गलवान व्हॅलीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यामध्ये चिनी सैनिक चीनचा ध्वज फडकवताना दिसत आहेत. या व्हिडिओवरून केंद्रातील मोदी सरकार लोकांच्या निशाण्यावर आले आहे. याआधी गलवानमध्ये जून २०२० मध्ये भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये संघर्ष झाला होता.
‘२०२२ च्या नवीन वर्षाच्या दिवशी गलवान व्हॅलीवर चीनचा राष्ट्रीय ध्वज फडकला’, असे या व्हिडीओमध्ये म्हटले आहे. या ट्विटमध्ये दावा करण्यात आला आहे की, हा ध्वज खास आहे कारण तो एकदा बीजिंगच्या तियानमेन स्क्वेअरवर फडकला होता. दरम्यान, यावर भारतातील विरोधक सरकारवर हल्लाबोल करत आहेत. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना याबाबत मौन तोडण्याचे आवाहन केले आहे.
“नमस्कार नरेंद्र मोदी, अमित शाह. ‘लाल डोळे’ राहू द्या, एकदा बोलून दाखवा की चीनने भारताची भूमी काबीज केली आहे. एवढ्या शौर्याची भाषा करणारे आता गप्प का बसलेत? २-४ अॅप्सवर बंदी घालणार नाही का? ५६ इंचाची छाती चिनी माल निघाला का?”, असे ददलानी यांनी म्हटले आहे.
गेल्या वर्षी जुलैमध्ये भारत आणि चीनने चकमकीच्या ठिकाणापासून दोन किमी अंतर मागे जाण्याचे मान्य केले होते. हा निर्णय राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्यात झालेल्या चर्चेनंतर झाला होता. गेल्या वर्षी जुलैपासूनच्या उपग्रह छायाचित्रांनी भारतीय आणि चिनी सैन्ये गलवान संघर्ष झालेल्या दोन्ही बाजूंपासून दोन किमी मागे सरकल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र व्हायरल होत असलेला व्हिडीओ हा त्या भागातला नसल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.
गलवान चकमकीत २० भारतीय जवान शहीद झाले होते. त्यांच्या शौर्याबद्दल त्यांना स्मारकांमध्ये त्यांची नावे बसवून सन्मानित करण्यात आले. चीनने चार सैनिक गमावल्याचा दावा केला होता मात्र, भारतीय लष्कराने चीनला जास्त जीवितहानी झाल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, भारत आणि चीनचे सैन्य या प्रकरणावर तोडगा काढण्यासाठी विविध स्तरांवर चर्चा करत आहेत. संरक्षण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, रस्ते, चार मोक्याचे रेल्वे मार्ग, अतिरिक्त ब्रह्मपुत्रा पूल यासह उत्तर सीमेवरील पायाभूत सुविधांचा विकास करण्यात येत आहे. दुहेरी-वापराच्या पायाभूत सुविधा शोधण्यासाठी देखील महत्त्वपूर्ण प्रयत्न केले गेले आहेत.