करोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने दिल्लीत कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. दरम्यान त्यातच दिल्लीतील नागरिकांच्या चिंतेत वाढ टाकणारी आणखी एक माहिती समोर आली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना करोनाची लागण झाली आहे. स्वत: अरविंद केजरीवाल यांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे.
अरविंद केजरीवाल यांनी आपल्याला सौम्य लक्षणं जाणवत असून घरात स्वत:ला विलगीकरणात ठेवण्यात आल्याची माहिती दिली आहे. दिल्लीत वेगाने करोनाचा संसर्ग फैलावत असून चिंता वाढली आहे. सोमवारी दिल्लीत करोनाचे ४०९९ रुग्ण आढळले होते.
“मी करोना पॉझिटिव्ह आढळलो आहे. सौम्य लक्षणं आहेत. घरातच स्वत:ला विलगीकरणात ठेवलं आहे. गेल्या काही दिवसांमध्ये माझ्या संपर्कात आलेल्यांनी स्वत:ला विलगीकरणात ठेवावं आणि चाचणी करुन घ्यावी,” असं अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं आहे.
दिल्लीतील वाढत्या करोना रुग्णांमुळे मंगळवारी सकाळी ११ वाजता डीडीएएमची एक बैठकदेखील आय़ोजित आहेत. या बैठकीत करोनाच्या स्थितीचा आढावा घेतला जाणार आहे. दिल्लीत ग्रेडेड रिस्पॉन्स अॅक्शन प्लानचा (GRAP) रेड अलर्ट जारी होण्याची शक्यता आहे. यामध्ये कर्फ्यूप्रमाणे निर्बंध असतात. सध्या राजधानी GRAP चा यलो अलर्ट आहे.