देशात करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या २४ तासांत देशात तब्बल ३७ हजार रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर, ओमायक्रॉन बाधितांच्या संख्येतही झपाट्याने वाढ होत आहे. त्यातच पंजाबच्या एका वैद्यकीय महाविद्यालयात करोनाचा विस्फोट झालाय. या महाविद्यालयात एकाच वेळी तब्बल १०० विद्यार्थी पॉझिटीव्ह आले आहेत.
काल पतियाळा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सुमारे १०० विद्यार्थ्यांची करोना चाचणी पॉझिटीव्ह आली. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने तातडीची बैठक घेऊन वसतिगृहात राहणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना तात्काळ खोल्या खाली करण्यास सांगितले. यानंतर मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनी तातडीची बैठक बोलावली आहे.
दरम्यान, पंजाबमधील ही दुसरी शिक्षण संस्था आहे जी करोनाचा हॉटस्पॉट ठरली आहे. गेल्या आठवड्यात, थापर इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी, पतियाळा येथील सुमारे ९३ विद्यार्थ्यांची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली होती. एनडीटीव्हीने यासंदर्भात वृत्त दिलंय.
दुसरीकडे पंजाबचे वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन मंत्री राज कुमार वेर्का यांनी मात्र परिस्थिती नियंत्रणात असल्याचं म्हटलंय. “परिस्थिती नियंत्रणात असून राज्य सरकारने जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाला सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे निर्देश दिले आहेत. आरोग्य पथकांद्वारे विद्यार्थ्यांच्या कोविड चाचण्या घेतल्या जात आहेत. मुख्यमंत्री चरणजित सिंह चन्नी यांनी आज तातडीची आढावा बैठक बोलावली आहे. सर्व जिल्ह्यांमधील परिस्थितीचा आढावा घेतला जाईल,” असं वेर्का म्हणाले.