कुलगाम, 04 जानेवारी: जम्मू काश्मीरमध्ये (Jammu and kashmir) पुन्हा एकदा भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाल्याची घटना समोर आली आहे. जम्मू काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील ओके परिसरात हा गोळीबार (kulgam firing) सुरू आहे. दोन्ही बाजूकडून क्रॉस फायरिंग सुरू आहे. स्थानिक पोलीस आणि भारतीय सुरक्षा दलांनी मोर्चा सांभाळला असून इन्काउंटर सुरू करण्यात आलं आहे. सुरक्षा दलांनी आतंकवादी लपून बसलेल्या परिसराला चहूबाजूंनी घेरलं असून गोळीबार सुरू आहे.
कुलगाम जिल्ह्याच्या ओके परिसरात काही दहशतवादी लपून सुरक्षा दलावर फायरिंग करत आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी घराबाहेर येऊ नये, अशा सूचना स्थानिक नागरिकांना दिल्या आहेत. चकमक सुरू झाल्यापासून दोन्ही बाजूंनी अंदाधुंद गोळीबार केला जात आहे. त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला असून नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियात वेगाने व्हायरल होतं आहे.
पोलिसांकडून देण्यात आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, कुलगाम जिल्ह्यातील ओके गावात इन्काउंटर सुरू करण्यात आलं आहे. स्थानिक विशेष पोलीस पथकाच्या मदतीने भारतीय जवानांनी संवेदनशील परिसराला घेरलं आहे. यामध्ये दोन आतंकवादी भारतीय जवानाच्या तावडीत सापडले असून ते जवानांवर बेछूट गोळीबार करत आहेत. भारतीय जवान देखील प्रत्युत्तर म्हणून आतंकवाद्यावर गोळीबार करत आहे.
आतापर्यंत जीवितहानी झाल्याची कोणतीही माहिती समोर आली नाही. या घटनेचा ग्राउंड झिरोवरून काढलेला व्हिडीओ समोर आला असून यामध्ये अंदाधुंद गोळीबार केल्याचा आवाज ऐकू येत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे