तामिळनाडूमध्ये जलीकट्टू स्पर्धेमध्ये करोनाचे सर्व नियमांचं उल्लंघन केलं जात असल्याचं चित्र दिसत आहे. दाक्षिणात्य राज्यांमध्ये शुक्रवारपासून जलीकट्टू या पारंपारिक खेळांच्या आयोजनाला सुरुवात झालीय. आज या खेळांचा दुसरा दिवस आहे. शुक्रवारी अवनियापुरममध्ये बैलांचा समावेश असणाऱ्या या खेळादरम्यान झालेल्या धावपळीमध्ये एका १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. बैलाने शिंग मारल्याने गंभीर जखमी झालेल्या या १८ वर्षीय प्रेक्षकाचा मृत्यू झालाय.
पोंगलच्या दिवशी बैलांवर नियंत्रण मिळवण्याच्या जल्लीकट्टू या खेळाच्या आयोजनाला सुरुवात केले. पहिल्याच दिवशी या खेळादरम्यान ५९ जण जखमी झाले आहेत. मागील वर्षीप्रमाणे या वर्षीही राज्य सरकारने खेळाच्या ठिकाणी बसण्यासाठी १५० जणांची आसन क्षमता आणि उपस्थित १५० जण अशी प्रेक्षक संख्या निश्चित केलीय. ही आसन क्षमता सामान्य संख्येच्या ५० टक्के इतकी आहे. मात्र या नियमांचं पालन केलं जात असल्याचं चित्र दिसत नाहीय. अनेक ठिकाणी शेकडोच्या संख्येने लोक हा खेळ पाहण्यासाठी उपस्थित असल्याचं चित्र दिसतंय.
आज मदुराईमध्ये हा खेळ खेळवला जात असून तिथेही करोना नियमांचं उल्लंघन करण्यात येत असल्याचं दिसत आहे. सरकारने करोना नियमांचं पालन करुन या खेळांच्या आयोजनाला मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात परवानगी दिली होती. एकीकडे करोनाचा प्रादुर्भाव वाढलेला असताना तसेच ओमायक्रॉनचा संसर्ग वेगाने होत असताना अशाप्रकारे गर्दी करुन खेळांचं आयोजन केलं जात असल्याबद्दल अनेकांनी आक्षेप व्यक्त केलाय.
काय आहे जलीकट्टू?
पोंगल सणादरम्यान खेळण्यात येणारा जलीकट्टू हा तामिळनाडूचा पारंपारिक खेळ आहे. या खेळावर सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली होती. मात्र जनमताच्या रेट्यानंतर ही बंदी पुन्हा उठवण्यात आली. जलीकट्टू या खेळाचा अर्थ आहे वळूंना वश करणे. या खेळाला २००० वर्षांची परंपरा आहे. तज्ज्ञांच्या मते जलीकटटू हे नाव या खेळाला त्याच्या वैशिष्ट्यामुळे पडले आहे. सल्ली कासू म्हणजे नाणी आणि कट्टू म्हणजे या नाण्यांचा संग्रह. एक पिशवी वळूच्या शिंगांना बांधली जाते. जेव्हा हे वळू पळतात तेव्हा त्यांच्या मागे युवक धावतात आणि त्यांच्या शिंगांना बांधलेली पिशवी काढून घेण्याचा प्रयत्न करतात. या खेळामध्ये जेलीकट या विशिष्ट जातीच्या वळूंचा वापर केला जातो म्हणून देखील या खेळाला जलीकट्टू हे नाव पडले आहे. शिंगांना पैसे बांधण्याव्यतिरिक्त खेळाडूंना मोठे बक्षीस देखील दिले जाते.