देशातील करोनाबाधितांच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ नोंदवण्यात येत आहे. ओमायक्रॉनचे रुग्ण देखील मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. पण या लाटेत रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण फार कमी आहे. पूर्ण लसीकरण केल्यानंतरही तुम्ही करोनापासून सुरक्षित राहू शकत नाही. तुम्हाला करोनाची लागण होऊ शकते, परंतु त्यामुळे रुग्णालयात दाखल होण्यासारखी गंभीर परिस्थिती नक्कीच उद्भवत नाही. सध्या ओमायक्रॉनमुळे रुग्णांचा हॉस्पिटलायझेशन रेट हा ४% पेक्षा कमी आहे. एका अग्रगण्य सरकारी रुग्णालयाशी संबंधित संशोधकांनी भारतातील पहिल्या महामारीविज्ञान अभ्यासातील मुद्द्यांच्या आधारे ओमायक्रॉनचा अभ्यास केल्यानंतरचे हे मुद्दे आहेत.
वैद्यकीय शास्त्राच्या प्री-प्रिंट रिपॉझिटरीवर प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या निकालांनी हे देखील दर्शविले आहे की ओमायक्रॉनचा सामहिक संसर्ग डिसेंबर महिन्यात दिल्लीमध्ये होता. दक्षिण आफ्रिकेने या प्रकाराबद्दल जगाला अलर्ट केल्यानंतर काही दिवसांनी आणि विमानतळ स्क्रीनिंग किंवा इतर देशांतील उड्डाणे कमी करण्याचा निर्णय देशाने घेतला.
दिल्लीतील यकृत आणि पित्तविषयक विज्ञान संस्थेशी संबंधित संशोधकांनी राष्ट्रीय राजधानीतील पाच जिल्ह्यांतील २६४ करोना पॉझिटिव्ह नमुन्यांची जीनोम सिक्वेंसिंग केली आणि त्यापैकी ८२ मध्ये ओमायक्रॉन विषाणू आढळला. तर, बाकीच्यांना डेल्टा प्रकाराची लागण झाली होती. नमुन्याचा आकार लहान असला तरी, भारतातील अनेक भागांमध्ये ओमायक्रॉन बाधितांच्या वाढीचे प्रातिनिधिक विश्लेषण म्हणून या अभ्यासाकडे पाहिले जात आहे.
गेल्या वर्षी २५ नोव्हेंबर ते २३ डिसेंबर दरम्यान पॉझिटिव्ह आलेल्या २६४ रुग्णांच्या विश्लेषणात असे आढळून आले की ओमायक्रॉनची लागण झालेल्या रूग्णांपैकी ७२ किंवा ८८% लोकांचं कोविशील्ड किंवा कोवॅक्सिन यापैकी एका लसीने पूर्णपणे लसीकरण करण्यात आले होते. आणखी एका रुग्णाला मॉडर्ना लसीचे दोन डोस आणि कोवॅक्सिनचा तिसरा डोस मिळाला होता. ओमायक्रॉन बाधित रूग्णांपैकी फक्त तीन रूग्णांना हॉस्पिटलायझेशनची आवश्यकता होती आणि प्रत्येकाला मधुमेह किंवा उच्च रक्तदाब यासारख्या शारिरीक व्याधी होत्या. मात्र, त्यापैकी कोणालाही आयसीयूची गरज नव्हती.
भारतात करोनाच्या आधीच्या लाटांमध्ये रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण २०-२३% होते.