नवी दिल्ली : भारताविरोधात प्रसार केल्यामुळे भारत सरकारने पाकिस्तानातून चालविल्या जाणाऱ्या ३५ यू ट्यूब वाहिन्यांवर बंदी घातली आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार, या वाहिन्यांच्या वर्गणीदारांची संख्या सुमारे एक कोटी २० लाख इतकी, तर त्यावरील ध्वनिचित्रफिती पाहिलेल्यांची संख्या १३० कोटींहून अधिक आहे.
या ३५ यू ट्यूब वाहिन्यांसह दोन इन्स्टाग्राम खाती, दोन ट्विटर खाती, दोन फेसबुक खाती आणि दोन संकेतस्थळांवरून भारताविरोधात खोटा प्रचार केला जात होता. माहिती आणि प्रसारण खात्याने शुक्रवारी दिलेल्या माहितीनुसार, या सर्व वाहिन्या, खाती आणि संकेतस्थळे बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तथ्यहीन प्रचार आणि भारतविरोधी माहिती प्रसारित केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
माहिती आणि प्रसारण खात्याचे सहसचिव विक्रम सहाय म्हणाले की, ही सर्व खाती, वाहिन्या, पाकिस्तानातून चालविली जात होती. त्यांच्यावरून भारतीय सैन्यदले, जम्मू-काश्मीर, भारताचा परराष्ट् व्यवहार, जनरल बिपिन रावत यांचा मृत्यू यांच्याबाबत खोडसाळ, खोटा प्रचार केला जात होता. त्याशिवाय फुटीरवादी विचारसरणीला खतपाणी घालून कायदा सुव्यवस्था धोक्यात आणण्याचे काम केले जात होते.