पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या महिन्याच्या ‘मन की बात’ची वेळ बदलली; महात्मा गांधी पुण्यतिथीदिवशी होणार प्रसारण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मासिक रेडिओ कार्यक्रम मन की बातचा ८५ वा भाग येत्या रविवारी म्हणजेच ३० तारखेला प्रसारीत होणार आहे. नव्या वर्षातला हा पहिलाच कार्यक्रम असेल. या महिन्यात मात्र या कार्यक्रमाची वेळ काहीशी बदलली आहे. सकाळी ११ ऐवजी या रविवारी हा कार्यक्रम सकाळी ११.३० वाजता प्रसारीत होणार आहे.

३० जानेवारीला महात्मा गांधीजींची पुण्यतिथी आहे. त्यानिमित्ताने या कार्यक्रमाच्या वेळेत बदल करण्यात आल्याचं पंतप्रधान कार्यालयाकडून सांगण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या मन की बात या मासिक रेडिओ कार्यक्रमाच्या माध्यमातून दर महिन्याला जनतेशी संवाद साधतात. दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी हा कार्यक्रम प्रसारीत केला जातो.

हा कार्यक्रम ऑल इंडिया रेडिओची सर्व केंद्रे, दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून प्रसारीत केला जातो. तसंच AIR News हे संकेतस्थळ आणि मोबाईल अॅपवरूनही हा कार्यक्रम ऐकता येऊ शकतो. काही दिवसांपूर्वीच पंतप्रधानांनी या कार्यक्रमासाठी जनतेच्या सूचना मागवल्या होत्या.

या महिन्याच्या ३० तारखेला मन की बात हा कार्यक्रम प्रसारीत होईल. मला खात्री आहे तुमच्याकडे सांगण्यासारख्या अनेकांच्या आयुष्यातल्या प्रेरणादायी कथा असतील. त्या आमच्याकडे पाठवा. नमो अॅपवरही तुम्ही विषय सुचवू शकता, असं ट्वीट काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं.

Comments : 0


    No Comments

Leave a comment