सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा जेल नाही बेल म्हणजेच तुरुंगवास नाही जामीन या मुद्द्यावर जोर देताना कोणत्याही व्यक्तीला राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका आहे, असं कारण देत अनिश्चित कालावधीसाठी तुरुंगामध्ये ठेवता येणार नसल्याचं स्पष्ट केलंय. न्यायालयाने कोणत्याही व्यक्तीला केवळ शक्यतेच्या आधारावर अनिश्चित कालावधीसाठी तुरुंगामध्ये डांबून ठेवता येणार नाही, असं स्पष्ट करताना यामध्ये तपास यंत्रणांकडून मोठ्या कटाची योजना या कारणाखाली पुराव्यांशिवाय शक्यतांच्या आधारे एखाद्या व्यक्तीला तुरुंगात ठेवता येणार नाही असं म्हटलंय. हा निकाल न्यायमूर्ती डी. व्हाय. चंद्रचूड आणि न्या. दिनेश माहेश्वरी यांच्या खंडपीठाने सीमेपलीकडून पशू तस्करी प्रकरणी अटक करण्यात आलेला मुख्य आरोपी मोहम्मद इनामुल हकला जामीन मंजूर करताना दिलाय.
प्रकरण काय?केंद्रीय तपास यंत्रणांनी या प्रकरणामध्ये बीएसएफच्या एका कमांडरलाही त्याच्या कथित सहभागासाठी अटक केली होती. या प्रकरणामध्ये करण्यात आलेल्या आरोपानुसार पशू तस्करीमधून मिळालेले पैसे कथित पद्धतीने राजकीय पक्ष आणि स्थानिक प्रशासनातील अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचा दावा करण्यात आलेला. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सीबीआयच्या वकिलांनी या नियोजित कटाची चौकशी प्रलंबित असून ती सुरु आहे, असं न्यायालयाला सांगितलं. त्यावर न्या. चंद्रचूड आणि न्या. माहेश्वरी यांनी, ही अशी कोणती चौकशी केली जातेय जी आम्हाला समजत नाहीय, असा प्रश्न विचारला.
अल्पवयीन मुलगी फोनवर जास्त वेळ घालवत असल्याने वडिलांने वारंवार केला बलात्कार
एवढा वेळ पुरेसा नाही का?तपास करताना अशाप्रकारे एखाद्या व्यक्तीला अनिश्चित कालावधीसाठी ताब्यात घेऊन तपासात काय फायदा होतोय, असा प्रश्नही न्यायलयाने उपस्थित केला. तसेच खास करुन अन्य व्यक्तींना जामीन मंजूर करण्यात आलेला असताना या प्रकरणामधील संबंधित व्यक्ती ही मागील एक वर्ष दोन महिन्यांपासून तुरुंगामध्ये आहे, याकडे लक्ष वेधत मोठ्या कटाचा तपास करण्यासाठी हा कालावधी पुरेसा नाही का?, असा प्रश्न न्यायालयाने उपस्थित केला.
एका वर्षाहून अधिक काळ जामीन नाकारणे…इनामुल हकच्या वतीने सर्वोच्च न्यायलयामध्ये बाजू मांडताना वरिष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी सीबीआयकडून पशू तस्करीच्या प्रकरणामध्ये ६ फेब्रुवारी २०२१ रोजी चार्जशीट दाखल करण्यात आली होती. यासंदर्भात मागील वर्षी २१ फेब्रुवारी रोजीच न्यायालयामध्ये पूरक चार्जशीट दाखल करण्यात आली. त्यानंतर बीएसएफच्या कमांडरसहीत अन्य आरोपींना न्यायलयाने जामीन मंजूर केला. मात्र कोलकाता उच्च न्यालयाने इनामुल हकला जामीन दिला नाही. रोहतगी यांनी या प्रकरणामध्ये सर्वाधिक शिक्षा सात वर्षांपर्यंत असू शकते. त्यामुळेच एका वर्षाहून अधिक कालावधीसाठी जामीन नाकारणे चुकीचं आहे, असा युक्तीवाद न्यायलयासमोर करण्यात आला.
सीबीआयकडून काय दावा करण्यात आला?यावर सीबीआयच्या वकिलांनी इनामुल हक पशू तस्करीचा मास्टरमाइंड असल्याचं सांगितलं. यामध्ये बीएसएफच्या लोकांबरोबरच, कस्टमचे अधिकारी, स्थानिक पोलिसांबरोबरच अन्य व्यक्तीही सहभागी असल्याचं सांगण्यात आलं. इनामुल हकसाठी लूक आऊट नोटीस जारी करण्यात आल्याचं समोर आलं नाही तरी तो बांगलादेशमार्गे बंगालमध्ये पोहचला. यावरुन इनामुल हक आणि स्थानिक पोलिसांमध्ये लागेबांधे आहेत असा युक्तीवाद सीबीआयकडून करण्यात आला. याच कारणामुळे तो राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका ठरु शकतो असंही सांगण्यात आलं. मात्र दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने इनामुल हकला जामीन मंजूर केला.