मागच्या काही दिवसांपासून देशात सातत्याने ३ लाखापेक्षा जास्त करोनाबाधित आढळत होते. परंतु गेल्या २४ तासांत देशातील रुग्णसंख्येत मोठी घट नोंदवण्यात आली आहे. देशात अनेक दिवसांनी ३ लाखांपेक्षा कमी बाधित आढळले आहेत. सोमवारी देशभरात २ लाख ५५ हजार ८७४ रुग्ण आढळले आहेत. रविवारच्या तुलनेत सोमवारी ५० हजार १९० कमी बाधितांची नोंद करण्यात आली. याशिवाय सोमवारी ६१४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
गेल्या २४ तासांत करोनातून २ लाख ६७ हजार ७५३ जण बरे देखील झाले आहेत. देशात सध्या २२ लाख ३६ हजार ८४२ सक्रिय रुग्ण उपचाराधीन असून दैनंदिन पॉझिटिव्हीटी रेट १५.५२ टक्क्यांवर आहे. तर रुग्ण बरे होण्याचा दर म्हणजेच रिकव्हरी रेट सध्या ९३.१५ टक्के आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार देशात आतापर्यंत तब्बल ३ कोटी ७० लाख ७१ हजार ८९८ जणांनी करोनावर मात केली आहे. तर आतापर्यंत ४ लाख ९० हजार ४६२ जणांना करोनामुळे जीव गमवावा लागला आहे.
दरम्यान, राष्ट्रीय लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत देशात १६२.९२ कोटी लसीचे डोस नागरिकांना देण्यात आले आहेत.