सौदी अरेबिया आणि थायलंड या दोन देशांमध्ये तब्बल ३० वर्षानंतर पुन्हा एकदा मैत्रीपूर्ण संबंध निर्माण झाले आहेत. सौदीने मंगळवारी थायलंडसोबतचे राजकीय संबंध पूर्णपणे नव्याने सुरु करण्याचा निर्णय मंगळवारी घेतला. एका हिऱ्याच्या चोरीवरुन (Thailand Saudi Arabia Blue Dimond Issue) या दोन देशांमधील राजकीय नातं पूर्णपणे संपुष्टात आलं होतं. या दोन्ही देशांमध्ये कोणत्याही पद्धतीची चर्चा मागील ३० वर्षांमध्ये झाली नाही. मात्र आता या दोन्ही देशांनी नव्याने सुरुवात करण्याचा निर्णय घेतलाय.
सन १९८९ मध्ये राजा फैसल बिन फहद यांच्या राजवाड्यातून ९१ किलो वजनाचे दागिने आणि काही मौल्यवान रत्नं चोरीला गेले होते. या चोरीमध्ये थायलंडच्या एका नागरिकाचा हात होता. क्रिआंगक्राई टेकामोंग असं ही चोरी करण्याऱ्याचं नाव होतं. ही व्यक्ती राजवाड्यामध्ये नोकर म्हणून काम करायचीय. चोरी केल्यानंतर सर्व दागिने या व्यक्तीने एका व्हॅक्यूम क्लिनरच्या बॅगमध्ये लपवले. यामध्ये ५० कॅरेटचा मौल्यवान असा ब्लू डायमंडही होता.
हे सर्व मौल्यवान सामान क्रिआंगक्राईने थायलंडमधील लैम्पांग प्रांतामध्येही पाठवलं. मात्र एवढ्या महागड्या संपत्तीची विल्हेवाट लावणं त्याला जमलं नाही. त्यामुळे तो कमी किंमतीला हे दागिने विकू लागला. मात्र काही दिवसांमध्येच त्याच्याबद्दल शंका घेण्यात आल्या आणि तो तपास यंत्रणांच्या जाळ्यात अडकला. रॉयल थाय पोलिसांनी तपास सुरु केला तेव्हा संपूर्ण प्रकरण समोर आला. क्रिआंगक्राईला दोषी ठरवून त्याला सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली.
थायलंडचे पंतप्रधान प्रयुत चान-ओचा यांनी सौदी अरेबियाच्या अधिकृत दौऱ्यादरम्यान दोन्ही देशांनी संबंध नव्याने सुरु करण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं. १९८९ घटनेनंतर दोन्ही देशांमधील संबंध बिघडल्यानंतर आता दोन्ही देशांमध्ये पहिल्यांदाच उच्च स्तरीय बैठक झाली. सौदी अरेबियाने या चौरीच्या घटनेमुळे राजकीय संबंध ठेवण्याच्या आपल्या धोरणांमध्ये थायलंडबरोबरच्या संबंधांना फारच कमी महत्व देत ते संपुष्टात आणले होते. या चोरीच्या घटनेमुळे अनेकांच्या रहस्यमयरित्या हत्याही झाल्या. हे प्रकरण ‘ब्लू डायमंड’ नावाने ओळखलं जातं.
शाही राजवाड्यामध्ये पार पडलेल्या बैठकीमध्ये सौदी प्रसारमाध्यमांनी मंगळवारी रात्री एक पत्रक जारी करत सौदीचे राजकुमार मोहम्मद बिन सलमान यांनी प्रयुत यांच्यासोबत चर्चा केल्याचं जाहीर केलं. या चोरीच्या घटनेला विसरुन दोन्ही देशांमधील आर्थिक, राष्ट्रीय सुरक्षेबरोबरच राजकीय संबंध पुन्हा नव्याने सुरु करण्यावर दोन्ही देशांचं एकमत झालं आहे.