जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत पाच दहशतवादी ठार झाले आहे. यामध्ये जैश-ए-मोहम्मदचा कमांडर जाहिद वानी आणि एका पाकिस्तानी दहशतवाद्याचाही समावेश आहे. दरम्यान, जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात शनिवारी अतिरेक्यांनी एका पोलिसाची गोळ्या झाडून हत्या केली होती.
या चकमकीसंदर्भात माहिती देताना काश्मीर पोलिसांचे आयजी म्हणाले की, “गेल्या १२ तासांत दोन चकमकीत पाकिस्तान प्रायोजित प्रतिबंधित दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मदचे ५ दहशतवादी मारले गेले. यामध्ये जैश-ए-मोहम्मदचा कमांडर दहशतवादी जाहिद वानी आणि एका पाकिस्तानी दहशतवाद्याचा समावेश आहे.”
मिळालेल्या माहितीनुसार, सुरक्षा दलांनी शनिवारी संध्याकाळी पुलवामा जिल्ह्यातील नायरा भागात ऑपरेशन सुरू केले. या परिसरात दहशतवादी असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. पोलीस, लष्कर आणि सीआरपीएफचे संयुक्त पथक हे ऑपरेशन करत होते. कारवाई करत सुरक्षा दलांनी चार दहशतवाद्यांना ठार केले आणि मोठ्या प्रमाणात शस्त्रेही जप्त करण्यात आली. यात जैश-ए-मोहम्मदचा कमांडर जाहिद वानीही सहभागी होता. १४ फेब्रुवारी २०१९ रोजी झालेल्या दहशतवादी घटनेतही जाहिदचा सहभाग होता ज्यात ४० हून अधिक CRPF जवान शहीद झाले होते.
दुसरी चकमक बडगाम जिल्ह्यातील चरारे शरीफ येथे झाली. येथेही पोलीस आणि सीआरपीएफने मिळून संयुक्तरित्या ही कारवाई केली. या कारवाईत सुरक्षा दलांनी लष्कर-ए-तोयबाच्या एका दहशतवाद्याचा खात्मा केला. यावेळी सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांकडून AK-56 सह अनेक शस्त्रे जप्त केली आहेत.
शनिवारी अनंतनागच्या बिजबेहारा भागातील हसनपोरा येथे दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीर पोलीस हेड कॉन्स्टेबल अली मोहम्मद यांची गोळ्या झाडून हत्या केली. अली मोहम्मद यांच्या घरावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. ज्यामध्ये ते गंभीर जखमी झाले. त्यानंतर त्यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिथे त्यांचा मृत्यू झाला. जम्मू-काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला असून मृत अली मोहम्मद यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही, लवकरच दोषींना शिक्षा होईल, असे सांगितले.