रशियाच्या फौजा बेलारसमध्ये जमल्या असताना युक्रेनच्या उत्तर सीमेचा फार मोठा भाग हा असंरक्षित आहे, असे वृत्त न्यू यॉर्क टाइम्सने दिले आहे. रशियाने बेलारसमध्ये अत्याधुनिक रॉकेट यंत्रणेसह हजारो सैनिक पाठविले आहेत. नजीकच्या युक्रेनला तीनही बाजूंनी कोंडीत पकडण्याची ही तयारी असल्याचे या वृत्तात म्हटले आहे. मायकेल स्विर्टझ यांनी हे वृत्त दिले आहे.
उत्तर युक्रेनमधून सीमेपलीकडे पाहिले असता दाट जंगलामुळे काही दिसत नसले तरी, ई-९५ महामार्गावरून जाताना बेलारसमध्ये झालेली सैन्याची जमवाजमव दिसते. सोविएत युनियनचा पाडाव झाल्यानंतरच्या काळात प्रथमच इतक्या मोठय़ा संख्येने येथे सैनिक आणले गेले आहेत, असे अधिकारी आणि लष्करी तज्ज्ञांचे मत आहे. याबाबत रशियाचे असे म्हणणे आहे की, पुढील महिन्यात होणार असलेल्या लष्करी सरावासाठी ही तयारी केली जात आहे. परंतु बेलारसमधील ही सज्जता म्हणजे युक्रेनची राजधानी कीव्हच्या नजीकच्या भागात हल्ला चढविण्याच्या व्यूहरचनेचा भाग असू शकतो, असे न्यू यॉर्क टाइम्सने म्हटले आहे. युक्रेनच्या सैन्याची बहुतांश कुमक ही देशाच्या पूर्व भागात जमा झालेली आहे. त्या भागात या सैन्याचा आठ वर्षांपासून फुटीरवाद्यांशी लढा सुरू आहे. या फुटीरवाद्यांना रशियाचा पाठिंबा आहे. त्यामुळे देशाच्या उत्तर सीमेवर हल्ला झाल्यास तेथे युक्रेनचे आवश्यक ते सैन्यबळ उभे करणे कठीण जाईल, असे लष्करी तज्ज्ञ आणि त्या देशाच्या सेनाधिकाऱ्यांनाही वाटते. रशियाने बेलारसचा ताबा घेतल्याने बेलारसलगत असलेली युक्रेनची १,०७० किलोमीटरची सीमा ही असुरक्षित बनली आहे, असे युक्रेनचे संरक्षणमंत्री ओलेक्सी रेझनिकोव्ह यांनी म्हटले आहे. बेलारसपासून नाही, तर रशियापासून धोका आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
युरोपीय महासंघाच्या प्रतिनिधींवर रशियाचे निर्बंध
वृत्तसंस्था, मॉस्को
ब्रुसेल्सने रशियावर निर्बंध लादल्यानंतर रशियानेही प्रत्युत्तर म्हणून युरोपीय महासंघाच्या आणखी काही अधिकाऱ्यांना रशियात प्रवेशास मनाई केली आहे. नेमक्या किती लोकांवर ही बंदी घातली, हे मात्र रशियाने स्पष्ट केलेले नाही. रशियाच्या परराष्ट्र खात्याच्या अधिकृत संकेतस्थळावर म्हटले आहे की, युरोपीय महासंघाच्या सदस्य देशांनी जशी बंदी घातली, तशीच आम्ही हे देश आणि त्यांच्या संस्थांच्या प्रतिनिधींवर घातली आहे. त्यांना रशियात येण्यास आम्ही मनाई केली आहे. रशियाने काही युरोपीय खासगी लष्करी कंपन्यांचे प्रमुख, सुरक्षासेवांचे काही सदस्य आणि युरोपीयन महासंघातील संसद सदस्य, अधिकारी यांनाही काळय़ा यादीत समाविष्ट केले आहे. रशियाविरोधी धोरण पुढे नेण्यात हे अधिकारी वैयक्तिक जबाबदार आहेत, असे रशियाचे म्हणणे आहे.