मंगळवारी संसदेमध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. हा निर्मला यांचा चौथा तर मोदी सरकारचा दहावा अर्थसंकल्प ठरला. अर्थसंकल्प सादर करुन झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेमध्येच विरोधी पक्षाच्या नेत्यांना भेटले. मोदींनी यावेळी ज्या विरोधी पक्षाच्या नेत्यांसोबत चर्चा केली त्यामध्ये काँग्रेसचे अधिर रंजन चौधरी, तृणमूल काँग्रेसचे नेते सुदिप बंडोपाध्याय, सुगाता रॉय, नॅशन कॉन्फरन्सचे फारुक अब्दुल्ला, डीएमकेचे ए राजा यासारख्या नेत्यांचा समावेश होता.
राज्यपालांबद्दलची तक्रार ऐकून मोदी म्हणाले…यावेळी पंतप्रधान मोदी जेव्हा तृणमूलचे खासदार सुगाता रॉय यांना भेटले तेव्हा त्यांनी पश्चिम बंगालच्या राज्यापालांबद्दल त्यांच्याकडे तक्रार केली. पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखर हे फार अडचणी निर्माण करत आहेत, असं रॉय यांनी पंतप्रधानांच्या कानावर घातलं. विशेष म्हणजे ही तक्रार ऐकून घेतल्यानंतर मोदींनी रॉय यांनाच तुम्ही कधी निवृत्त होताय असा प्रश्न विचारला. “तुम्ही कधी निवृत्त होताय?”, असं पंतप्रधानांनी रॉय यांना थेट विचारल्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला, असं एएनआयने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.
राज्यपालांनाच केलं ब्लॉक…पश्चिम बंगालमध्ये राज्य सरकारमध्ये सत्तास्थानी असलेल्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि केंद्रातील मोदी सरकारचा संघर्ष काही नवा नाही. अशातच सध्या बंगालचे राज्यपाल जगदीप धनखर आणि ममता बॅनर्जी यांच्यातील संबंधांमध्येही तणाव निर्माण झालाय. त्यातच राज्यपालांनी बंगालला लोकशाहीसाठीचा ‘गॅस चेंबर’ म्हटलं आणि हा तणाव कमालीचा वाढला. याचाच परिणाम म्हणून ममता बॅनर्जी यांनी राज्यपाल धनखर यांना ट्विटरवर थेट ब्लॉक केलंय. इतकंच नाही, तर याची माहिती स्वतः ममता बॅनर्जींनीच माध्यमांना दिलीय.
स्पष्टीकरण देताना ममता म्हणाल्या…“मी एका गोष्टीसाठी आधीच माफी मागते. राज्यपाल दररोज काहीतरी ट्वीट करून मला किंवा माझ्या अधिकाऱ्यांना शिवीगाळ करत असतात. ते असंवैधानिक आणि अनैतिक वक्तव्य करतात. ते सल्ला न देण्याचे निर्देश देतात. लोकनियुक्त सरकार वेठबिगार कामगार झालीय. मला याचा राग येतो. त्यामुळे मी राज्यपालांना ट्विटरवर ब्लॉक केलं आहे,” असं ममता म्हणाल्यात.