अमरिंदर सिंह मुख्यमंत्रीपदावरून पायउतार झाल्यानंतर ४२ आमदारांनी पंजाबचे मुख्यमंत्रीपद मी भूषवावे अशी इच्छा व्यक्त केली होती असा दावा काँग्रेस नेते सुनील जाखड यांनी व्यक्त केला आहे. याबाबतची एक चित्रफीत समाजमाध्यमावर आली असून, अबोहर येथील सभेत जाखड यांनी हे वक्तव्य केले.
या मतदारसंघात जाखड यांचे पुतणे संदीप हे काँग्रेसकडून रिंगणात आहेत. अमरिंदर यांच्यानंतर मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत जाखड यांचे नाव आघाडीवर होते. मात्र काँग्रेसने चरणजीतसिंग चन्नी यांना संधी दिली. आमदारांच्या बैठकीत सुनील जाखड यांना ४२ तर सुखजिंदर रंधावा यांना १६ तर अर्मंरदर यांच्या पत्नी प्रणीत कौर यांना १२ तर नवज्योर्तंसग सिद्धू यांना ६ आणि चन्नी यांना दोन मते मिळाल्याचा दावा जाखड यांनी केला. तर राहुल गांधी यांनी उपमुख्यमंत्रीपद देण्याचा प्रस्ताव दिला होता मात्र तो नाकारल्याचे जाखड यांनी नमूद केले.माझ्याकडे त्या वेळी कोणतेही पद नव्हते तरीही ४२ आमदारांचा पाठिंबा होता हे जाखड यांनी निदर्शनास आणून दिले.