प्राध्यापिका शांतीश्री धुलीपुडी पंडित यांची देशातील प्रतिष्ठित जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयू) नवीन कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शांतीश्री धुलीपुडी पंडित या जेएनयूच्या पहिल्या महिला कुलगुरू असतील. त्यांचा कार्यकाळ पाच वर्षांचा असेल. याआधी त्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्राध्यापक होत्या.
धुलीपुडी, या जेएनयूच्या १३ व्या कुलगुरू होणार आहेत. पंडित या प्राध्यापक एम. जगदेश कुमार यांच्यानंतर विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) अध्यक्षपदी नियुक्त होणार आहे. जेएनयूच्या कुलगुरूपदाचा पाच वर्षांचा कार्यकाळ गेल्या वर्षी पूर्ण झाल्यापासून एम जगदेश कुमार हे कार्यवाहक कुलगुरू म्हणून जबाबदारी पार पाडत होते.
शांतीश्री या जेएनयूची माजी विद्यार्थिनी आहेत. विद्यापीठाच्या स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीजमधून त्यांनी १९८६ मध्ये एमफिल आणि १९९० मध्ये पीएचडी मिळवली. यापूर्वी त्यांनी मद्रासच्या प्रेसिडेन्सी कॉलेजमधून राज्यशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठापूर्वी त्यांनी गोवा विद्यापीठातही अध्यापन केले आहे.
५९ वर्षीय शांतीश्री यांचा जन्म रशियातील सेंट पीटर्सबर्ग येथे झाला. तेव्हा त्यांची आई तिथल्या लेनिनग्राड ओरिएंटल फॅकल्टी विभागात तामिळ आणि तेलुगू विषयांची प्राध्यापक होत्या. माजी कुलगुरू कुमार आणि विद्यार्थ्यांच्या एका वर्गामध्ये अनेक मुद्द्यांवरून मतभेद असताना त्या अशा वेळी विद्यापीठाचे नेतृत्व करत आहेत. अशा परिस्थितीत सर्व विद्यार्थ्यांशी चांगले संबंध प्रस्थापित करणे ही त्यांची प्राथमिकता असणार आहेत.