करोनाच्या पहिल्या लाटेत महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाने आणि दिल्लीतील ‘आम आदमी पक्षा’च्या सरकारने मजुरांना स्थलांतरित होण्यासाठी प्रवृत्त केले. त्यामुळे अनंत हाल-अपेष्टा सहन करत या मजुरांना आपापल्या गावी परत जावे लागले. देशात करोना पसरवण्यास महाराष्ट्र काँग्रेस आणि दिल्लीतील ‘आप’ कारणीभूत आहेत. या पक्षांनी महाभयानक संकटातही गलिच्छ राजकारण केले, अशी घणाघाती टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी लोकसभेत केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या या टीकेसंदर्भात भाजपाचे राज्यसभेमधील खासदार छत्रपती संभाजीराजेंना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांनी अगदी सूचक शब्दांमध्ये यासंदर्भात भाष्य केलं आहे.
झालं असं की, भाजपाचे राज्यसभेचे खासदार छत्रपती संभाजीराजे हे आज दिल्लीमध्ये शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या भेटीला त्यांच्या शासकीय निवासस्थानी पोहचले. संभाजीराजेंच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आलं असून लवकरच संभाजीराजेंच्या खासदारकीचा कार्यकाळ पूर्ण होत असल्याने त्याच पार्श्वभूमीवर हलचालींना वेग आल्याची चर्चा दबक्या आवाजामध्ये दिल्लीच्या राजकीय वर्तुळात रंगू लागलीय. मात्र या भेटीसंदर्भात बोलताना संभाजीराजेंना मोदींच्या भाषणाबद्दलही प्रश्न विचारण्यात आला.
मोदींच्या भाषणावर काय म्हणाले?मोदींचं कालचं भाषण पाहिलं तुम्ही?, असा प्रश्न संभाजीराजेंना विचारण्यात आला असता संभाजीराजेंनी, “मी त्याच्यावर काही भाष्य नाही करत. मी राष्ट्रपती नियुक्त खासदार असून कशावरही बोलत नाही. मी दोन मेच्यानंतर बोलीन,” असं सांगितलं. संभाजीराजेंच्या खासदारकीचा कार्यकाळ दोन मे रोजी संपत असून त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी संजय राऊतांची घेतलेली ही भेट अधिक महत्वाची असल्याचं म्हटलं जात आहे.
भेटीचं कारण काय?संभाजीराजे हे संजय राऊत यांच्या निवासस्थानी आले तेव्हा बंगल्याच्या गेटवरच प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना गाठलं. त्यावेळी त्यांना, “भेटीचं नेमकं कारण काय?” असं विचारण्यात आलं. “दिल्लीचं वैशिष्ट हे आहे की खासदार, खासदार एकमेकांना भेटू शकतात, बोलू शकतात. आज सकाळी मी चहाला येतो म्हटलं बाकी काही नाही,” असं संभाजीराजे म्हणाले.
त्यानंतर संभाजीराजेंना, भेटीमागे काही राजकीय कारण आहे का असंही विचारण्यात आलं. त्यावर त्यांनी नाही असं उत्तर दिलं. सहज आपण एक खासदार म्हणून संजय राऊत यांची भेट घेण्यासाठी आलो आहोत असं संभाजीराजे म्हणाले.
संभाजीराजेंनी जरी या भेटीत राजकीय चर्चा होणार नसल्याचं सांगितलं असलं तरी या खासदारकीचा कार्यकाळ आणि पुढील वाटचालीबद्दल दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.