कर्नाटकमधील हिजाब प्रकरणाचे प्रतिसाद देशभर उमटू लागले आहेत. उडुपी जिल्ह्यातील कुंदापूर येथील सरकारी कनिष्ठ महाविद्यालयात हिजाब परिधान केलेल्या मुस्लीम विद्यार्थीनींना प्रवेश नाकारण्यात आल्यापासून या वादाला तोंड फुटले आहे. या प्रकरणावर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वाड्रा यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
हिजाब प्रकरणात मलाला युसूफझाईची उडी
नोबेल शांतता पारितोषिक विजेती आणि महिला हक्क कार्यकर्त्यी मलाला युसूफझाई हिनेही हिजाबवरून कर्नाटकात सुरू असलेल्या वादात उडी घेतली आहे. “कॉलेज आम्हाला अभ्यास आणि हिजाब यापैकी एक निवडण्यास भाग पाडत आहे. मुलींना त्यांच्या हिजाबमध्ये शाळेत प्रवेश नाकारला जाणे हे भयावह आहे. कमी किंवा जास्त कपडे घातल्याने महिलांच्या वस्तुनिष्ठतेवर आक्षेप घेतला जात आहे. भारतीय नेत्यांनी मुस्लिम महिलांकडे होत असलेले दुर्लक्ष थांबवले पाहिजे,” असे मलालाने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
नेमकं प्रकरण काय?
कर्नाटकातील उडुपी जिल्ह्यातील कुंदापूर येथील सरकारी कनिष्ठ महाविद्यालयात हिजाब (हेडस्कार्फ)वरून गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहे. हिजाब घालून महाविद्यालयात प्रवेश करणाऱ्या मुस्लीम विद्यार्थिनींना सातत्याने महाविद्यालयात प्रवेश नाकारण्यात येत आहे. कर्नाटक राज्य सरकारने जारी केलेल्या ड्रेस कोडबाबतच्या नियमानुसार हिजाब परिधान करण्यास परवानगी दिली जाणार नाही, असा कडक आदेश महाविद्यालयीन अधिकाऱ्यांनी देऊनही काही मुस्लीम विद्यार्थिनी आपल्या पालकांसह महाविद्यालयात आल्या असता त्यांना महाविद्यालयीन परिसराच्या बाहेर उभे करण्यात आले. त्यामुळे मुलींसह त्यांच्या पालकांनीही गेटबाहेर निदर्शने केली. त्याचवेळी या मुलींचा निषेध करण्यासाठी काही हिंदू विद्यार्थी भगवे उपरणे घालून महाविद्यालयाच्या परिसरात फिरत होते. त्यामुळे हा विषय अधिकच चिघळला.
जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला हा प्रकार उडुपी येथील सरकारी मुलींच्या कनिष्ठ महाविद्यालयात घडला. सहा विद्यार्थिनींनी ड्रेस कोडचे उल्लंघन करून हिजाब घालून वर्गात हजेरी लावली होती. महाविद्यालयाने वर्गाव्यतिरिक्त इतरत्र हिजाब घालण्याची परवानगी दिली होती.