नवी दिल्ली : करोनाचा धोका ओळखून तृणमूल काँग्रेसचे खासदार सौगत राय यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेऊन संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन लवकर संस्थगित करण्याची विनंती केली होती. पण, मोदींनी नंतर बघू असे उत्तर दिले होते. त्यावेळी भाजप मध्य प्रदेशमधील काँग्रेस सरकार पाडण्यात गुंतलेले होते. तेव्हा करोना पसरण्याची भीती भाजपला वाटली नव्हती का, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली.
लोकसभेत सोमवारी मोदींनी, करोनाच्या पहिल्या लाटेत महाराष्ट्रामुळे करोना देशभर पसरल्याचा आरोप केला. मोदींनी महाराष्ट्राबद्दल गैरसमज पसरवणारी विधाने करणे योग्य नव्हते. मोदी महाराष्ट्रावर टीका करून राज्या-राज्यांमध्ये वितुष्ट निर्माण करत आहेत. महाराष्ट्रामुळे करोना पसरल्याचा मोदींकडे शास्त्रीय पुरावा आहे का? महाराष्ट्राचा द्वेष करणे योग्य नाही. मुंबईचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्नही खपवून घेतला जाणार नाही. महाराष्ट्र दिल्लीच्या तख्तापुढे कधीही झुकणार नाही, असे प्रत्युत्तर सुळे यांनी दिले.
फुल न फुलाची पाकळी म्हणा, महाराष्ट्रातून भाजपचे १८ खासदार निवडून आले आहेत. मोदींना पंतप्रधान करण्यात महाराष्ट्राच्या मतदारांचा मोठा वाटा आहे. तरीही मोदींनी महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान केला आहे. मी पंतप्रधानांवर नाराज होण्यापेक्षा त्यांच्या वागणुकीमुळे अधिक अचंबित झाले आहे. मोदी एका पक्षाच्या वतीने बोलत होते. पंतप्रधान कधीही कुठल्या पक्षाचे वा राज्याचे नसतात, ते देशाचे पंतप्रधान असतात. त्यांच्या वक्तव्यामुळे शरद पवार यांनाही दु:ख झाले, असे सुळे म्हणाल्या. करोनाच्या काळात पक्ष विसरून खासदारांनी एकमेकांना मदत केल्याचेही सुळे यांनी सांगितले. करोनाच्या पहिल्या लाटेत श्रमिक रेल्वेगाडय़ा सोडल्याबद्दल विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तत्कालीन रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांचे आभार मानले होते. रेल्वेगाडय़ांची व्यवस्था केली असून प्रवाशांची यादी देण्याची विनंती गोयल यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली होती. श्रमिक रेल्वेगाडय़ा राज्यांनी नव्हे, केंद्राने सोडल्या होत्या. सर्वाधिक रेल्वेगाडय़ा गुजरातमधून सोडल्या गेल्या, असे सांगत सुळे यांनी, आपण माणुसकी विसरलो का, असा प्रश्नही विचारला.