“तुम्ही राजीव गांधींचे पुत्र आहात की नाही याचा पुरावा आम्ही कधी तुमच्याकडे मागितला का?” असा प्रश्न आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्व शर्मा यांनी विचारला आणि त्यावरून वाद सुरू आहे. त्यातच आता पुन्हा एकदा सरमा यांनी वादग्रस्त विधान केलंय. राहुल गांधी हे आधुनिक काळातील मोहम्मद अली जिना आहेत, असं म्हणत सरमा यांनी टीका केली आहे.
शनिवारी गुवाहाटी येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सरमा म्हणाले, “आमचे लष्करी जवान शत्रूच्या प्रदेशात कोणत्याही कारवाईसाठी जाण्यापूर्वी एक महिन्यासाठी योजना आखतात, या धोरणात्मक कारवाया असतात आणि कारवाई झाल्यानंतर प्रेस रिलीझ जारी केले जाते, त्यानंतर आम्हाला कळते. जर कोणी कारवाईचा पुरावा मागत असेल तर असा पुरावा मागितल्यावर लष्कराच्या जवानाला किती वेदना होतात याचा विचार करा.
“राहुल गांधींना असे वाटते की भारतात गुजरात ते पश्चिम बंगालचा समावेश आहे, गेल्या दहा दिवसांपासून मी असे प्रकार पाहतोय. एकदा त्यांना भारत राज्यांचा संघ वाटतो, तर दुसऱ्यांदा भारतात केवळ गुजरात ते बंगालपर्यंत आहे. ते वाटेत ते बोलताहेत म्हणून मी म्हणतोय की राहुल गांधींमध्ये जिनांचं भूत शिरलंय. जिना जी भाषा १९४७ पूर्वी वापरत असत ती आता राहुल गांधी वापरत आहेत. एक प्रकारे राहुल गांधी आधुनिक काळातील जिना आहेत,” असं सरमा म्हणाले.
यापूर्वीही सरमाचं वादग्रस्त विधान
उत्तराखंडमधील एका प्रचारसभे १२ फेब्रुवारी रोजी हेमंत बिस्व सरमा यांनी “तुम्ही राजीव गांधींचे पुत्र आहात की नाही? याचा पुरावा आम्ही कधी तुमच्याकडे मागितला आहे का?, असा सवाल केला होता. तसेच आपल्या देशाच्या लष्कराने पाकिस्तानात बॉम्ब फोडला असे म्हटले तर ते फोडलेच आहेत,” असे हेमंत बिस्व सरमा म्हणाले. “त्यांची मानसिकता पाहा, देशाचा अभिमान, जनरल बिपिन रावत यांच्या नेतृत्वाखाली लष्कराने पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक केले. त्यावर राहुल गांधींनी सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागितले आहेत”, असं ते म्हणाले होते.