रेडिओ हे माध्यम बऱ्याच काळापासून लोकप्रिय माध्यम राहिलं आहे. अनेकांच्या रेडिओसोबतच्या खास आठवणी आहेत. कोणाला रेडिओ म्हटलं की लहानपण आठवतं तर कोणाला पहिलं प्रेम. अशा या रेडिओची दारं आता तुरुंगातल्या कैद्यांसाठीही खुली होणार आहेत. आज जागतिक रेडिओ दिनापासून मध्य प्रदेशातल्या तुरुंगात रेडिओ स्टेशन सुरू करण्यात आलं आहे.
‘संजू’ चित्रपटातून येरवडा तुरुंगामध्ये सुरू असलेलं रेडिओ केंद्र आणि त्यावर कैद्यांमार्फत, कैद्यांसाठी चालवलेले कार्यक्रम याबद्दल आपल्याला थोडीशी कल्पना आली असेलच. तशाच पद्धतीचं रेडिओ केंद्र आता मध्य प्रदेशातल्या इंदौरमधल्या मध्यवर्ती कारागृहात सुरू होणार आहे. FM 18.77 ट्यून केल्यानंतर जेलवाणी हे रेडिओ केंद्र ऐकू येणार आहे.
याबद्दल कारागृह निरीक्षक अलका सोनकर म्हणाल्या, “व्यवस्थापनाची अशी भूमिका आहे की कारागृह हे सुधारगृह असायला हवं. या रेडिओ केंद्राच्या माध्यमातून कैद्यांना बाहेरच्या जगात काय चालू आहे, याबद्दल माहिती मिळेल. हा एक असा मंच ठरेल, ज्याच्या माध्यमातून आम्ही कैद्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्याचा प्रयत्न करू”.