एका मानसिक आजार असलेल्या ६० वर्षीय व्यक्तीने तीन वर्षांच्या मुलीवर चाकूने वार करून जीवे मारल्याची घटना समोर आली आहे. आसामच्या कछार जिल्ह्यात रविवारी ही घटना घडली. दरम्यान आरोपीला अटक करण्यात आली आहे, असे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या व्यक्तीने मुलीच्या पालकांसमोर हा गुन्हा केला आहे. गुन्ह्यानंतर आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र स्थानिकांनी त्याला पकडले आणि त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. तर, संतप्त स्थानिकांनी ती व्यक्ती जिथे राहत होती ती झोपडी जाळून टाकली आहे. परंतु त्याला मारहाण न करता पोलिसांना सोपवले.
हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, सविस्तर माहिती अशी की कचार जिल्ह्यातील ढोलाई पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या श्यामचरणपूर गावात रविवारी दुपारी साडेचारच्या सुमारास ही घटना घडली. सलमान उद्दीन लस्कर आणि हफसाना बेगम लस्कर हे या चिमुरडीचे पालक आहेत. त्यांनी सांगितले की, ते त्यांच्या घरी असताना आरोपी अचानक घरात घुसला आणि त्याने मुलीला तिच्या आईकडून हिसकावून घेतले.
“त्याने आमच्या मुलीला अचानक हिसकावून घेतले, तिला जमिनीवर फेकले आणि तिच्यावर धारदार वस्तूने वार करायला सुरुवात केली. आमच्यासाठी तो सर्वात भयानक क्षण होता आणि आम्ही तिला वाचवण्यासाठी धावलो, पण उशीर झाला होता. माझ्या मुलीला रक्तस्त्राव झाला आणि ती बेशुद्ध पडली. आम्ही तिला घेऊन सिलचर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये धाव घेतली पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले,” असे मुलीचे वडील सलमान उद्दीन लस्कर यांनी सांगितले.
दरम्यान या आरोपींवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मुलीच्या आईने केली आहे. “पोलीस अधिकारी सांगत आहेत की तो मानसिक आजारी आहे पण त्यामुळे काहीही बदल होत नाही. मी त्याला माफ करू शकत नाही कारण त्याने माझ्या मुलीला माझ्यासमोर मारले आहे. मुलगी डोळ्यासमोर जाण्याच्या फक्त आईलाच वेदना जाणवू शकतात आणि त्याला कठोर शिक्षा देण्यात यावी,” अशी मागणी तिने केली.
कचार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक रमनदीप कौर यांनी सांगितले की, “त्या व्यक्तीला आधीच अटक करण्यात आली असून त्याला आज न्यायालयात हजर केले जाईल. ही एक दुर्दैवी आणि वेदनादायक घटना आहे परंतु ती व्यक्ती मानसिकदृष्ट्या आजारी असल्याचे म्हटले जाते. आम्ही त्याला अटक केली असून त्याच्या कुटुंबात कोण आहे का, याचा शोध घेत आहोत. त्याला कोर्टात हजर केले जाईल आणि कोर्ट ठरवेल की त्याला कोणत्या प्रकारची शिक्षा दिली जाईल.”