कर्नाटकमध्ये बजरंग दलाच्या २३ वर्षीय कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली आहे. रविवारी रात्री शिवमोग्गा जिल्ह्यात हर्षाची ही हत्या करण्यात आली. हत्येनंतर परिसरात तणाव असून जमावबंदी लागू करण्यात आली आहे. हर्षाला जिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं होतं, मात्र त्याला मृत घोषित करण्यात आलं.
सोशल मीडियावर हिजाबसंबंधी पोस्ट टाकल्यामुळे ही हत्या केल्याचं बोललं जात आहे. मात्र कर्नाटकच्या गृहमंत्र्यांनी सध्या राज्यात सुरु असलेल्या हिजाब वादाशी याचा काही संबंध नसल्याचं म्हटलं आहे. ते म्हणाले की, “पण कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचण्यापूर्वी आम्हाला पुढील तपासाची प्रतीक्षा करावी लागेल”. टेलर असणाऱ्या या कार्यकर्त्याच्या कुटुंबाची गृहमंत्र्यांनी भेटही घेतली आहे.
“रविवारी रात्री ९.३० वाजता हत्या झाली. पोलिसांना काही पुरावे सापडले आहेत. आम्ही लवकरच आरोपींना अटक करु,” असं त्यांनी सांगितलं आहे. यावेळी त्यांनी लोकांनी शांतता पाळण्याचं आवाहन केलं आहे. “या हत्येचं नेमकं कारण काय याची माहिती अद्याप मिळालेली नाही. शिवमोग्गा राखीव पोलिसांना पाठवलं जात आहे,” असं त्यांनी सांगितलं.
या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांचं एक विशेष पथक तयार करण्यात आलं आहे. तर रॅपिड अॅक्शन फोर्सलाही तैनात केलं जात आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी गृहमंत्र्यांशी चर्चा करत तपासासंबंधी माहिती घेतली आहे. दरम्यान गृहमंत्र्यांनी या हत्येमध्ये चार ते पाच लोक सहभागी असावेत असं सांगितलं आहे.
गृहमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, “शिवमोग्गामधील कायदा आणि सुव्यवस्था नियंत्रणात आहे. पूर्वकाळजी म्हणून परिसरातील शाळा आणि कॉलेज दोन दिवसांसाठी बंद ठेवण्यात आले आहेत”.
दरम्यान कर्नाटकचे मंत्री के एस इश्वरप्पा यांनी आपण बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची हत्या झाल्याने विचलित झालो असल्याचं म्हटलं आहे. तसंच मुस्लिम गुंडांनी हत्या केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. आम्ही गुंडगिरी चालू देणार नाही असा इशारा त्यांनी दिला आहे.
दरम्यान केरळमध्ये सीपीआय(एम)च्या कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली आहे. या हत्येमागे आरएसएस असल्याचा आरोप पक्षाने केला आहे. पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत.