युक्रेनविरोेधात युद्धाची घोषणा केल्यानंतर शुक्रवारी युद्धाच्या दुसऱ्या दिवशी रशियन सैन्याची आगेकूच सुरूच राहिली. तिसऱ्या दिवशीही रशियाने आक्रमक हल्ले करण्यास सुरुवात केलीय. शुक्रवारीच रशियाकडून युक्रेनची राजधानी किव्हच्या उपनगरांवर क्षेपणास्त्र हल्ले करण्यात आलेत. एकीकडे रशियाने वेगाने युक्रेनचा प्रदेश ताब्यात घेत असताना दुसरीकडे युक्रेन कडवी झुंज देताना दिसत आहे. अशीच एक घटना युक्रेनच्या ताब्यातील काळ्या समुद्रामधील स्नेक बेटांवरुन समोर आलीय.
युक्रेनच्या मुख्य भूभागापासून ४८ किलोमीटरवर स्नेक बेट आहे. या बेटाचा आकार फारच छोटा म्हणजे १८ हेक्टर्स इतका आहे. असं असलं तरी लष्करी दृष्ट्या या बेटाला फार महत्व आहे. म्हणूनच रशियाने हल्ला केला तेव्हा या ठिकाणी तैनात असणाऱ्या १३ युक्रेनियन सैनिकांनी बेटाचा ताबा सोडण्यास नकार दिला. त्यानंतर रशियन नौदलाने युक्रेनच्या या १३ सैनिकांना मारुन टाकलं.
रशियन युद्धनौका आणि या युक्रेनच्या सैनिकांदरम्यान झालेल्या संवादामध्ये रशियन नौदलाच्या जहाजाने या बेटावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यापूर्वी त्यांनी उद्घोषणा करुन या सैनिकांना शरण या असं आवाहन केलं. शरण या नाहीतर उगाच रक्तपात होईल असा धमकी वजा इशारा रशियन युद्धनौकेवरुन देण्यात आला.
मात्र रशियन नौदलाचं भलं मोठं जहाज समोर असताना या युक्रेनच्या सैनिकांनी शरण न येण्याचा निर्णय घेतला. त्यांनी उलट शिवीगाळ करत या जहाजाला निघून जाण्यास सांगितलं. “रशियन युद्धनौकांनी इथून निघून जावं. F*** O**” असं उत्तर या सैनिकांनी दिलं. यानंतर रशियन सैनिकांनी या बेटाचा ताबा मिळवण्यासाठी या सैनिकांची हत्या केली. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी या सैनिकांना युक्रेनकडून योग्य तो सन्मान दिला जाईल असं सांगतानाच त्यांना राष्ट्रीय हिरो असं म्हटलंय.
काही वृत्तसंस्थांनी दिलेल्या वृत्तानुसार रशियाने युक्रेनची राजधानी किव्हवर हल्ला केला असून भीतीने नागरिकांनी भुयारी मेट्रो स्थानकांमध्ये आश्रय घेतला आहे, तर काही नागरिक पश्चिमात्य देशांमध्ये आश्रयाला जात आहेत. शुक्रवारी युक्रेनच्या पश्चिम सीमेवर शेकडो महिला आणि मुले शेजारच्या देशांमध्ये प्रवेश करण्यासाठी उभे असल्याचे आढळले. रशियाने मात्र किव्हवर हल्ला केल्याचे वृत्त फेटाळले आणि रशियन सैन्य नागरी भागांना लक्ष्य करणार नाही, असे स्पष्ट केले.
प्राथमिक आकडेवारीनुसार, गुरुवारी पहाटे रशियाने आक्रमण केल्यापासून युक्रेनच्या काही सैनिकांसह १३७ जण ठार आणि ३१६ जण जखमी झाले, अशी माहिती युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी गुरुवारी उशिरा दिली. रशियाने राजधानी किव्हसह अन्य शहरांवर हवाई हल्ले केल्यामुळे युक्रेनमधील हजारो लोक सुरक्षिततेसाठी पश्चिमात्य देशांमध्ये पळून जात आहेत.