रशिया आणि युक्रेमध्ये युद्ध (Russia Ukraine War) सुरू आहे. आज युद्धाचा आठवा दिवस आहे. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यांमध्ये युक्रेनचे मोठे नुकसान झाले आहे. रशियाने युद्ध थांबवावे यासाठी अमेरिकेकडून रशियावर दबाव आणला जात आहे. अमेरिकेकडून रशियावर मोठ्याप्राणात आर्थिक निर्बंध लादण्यात आले आहेत. रशियाची सर्वच बाजुने कोंडी करण्याचा अमेरिकेचा प्रयत्न आहे. बुधवारी ‘यूएनजीए’ (UNJA) कडून रशियाचा निषेध करण्यासाठी ठराव मंजूर करण्यात आला होता. यावेळी रशियाच्या विरोधात 141 देशांनी मतदान केले तर पाच देशांनी रशियाच्या बाजूनं मतदान केले. तर 35 देश तटस्त राहिले. तटस्थ देशांच्या यादीत भारताचा देखील समावेश होतो. भारत तटस्थ राहिल्याने अमेरिकेकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. काउंटरिंग अमेरिकाज अॅडव्हर्सरीज थ्रू सॅन्क्शन्स अॅक्टनुसार (CAATSA)भारतावर निर्बंध घालावेत का यावर चर्चा सुरू असल्याचे एका उच्चपदस्थ अमेरिकन अधिकाऱ्याने सांगितले आहे.
पुढे बोलताना या अधिकाऱ्याने सांगितले की, भारताने रशियाच्या विरोधात मतदान न करता तटस्थ राहाण्याची भूमिका घेतली. त्यामुळे आम्ही काउंटरिंग अमेरिकाज अॅडव्हर्सरीज थ्रू सॅन्क्शन्स अॅक्टनुसार भारतावर निर्बंध घालावेत की नाही यावर चर्चा करत आहोत. निर्बंध घातल्यास भारताला रशियाकडून क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली खरेदी करण्यास मनाई करण्यात येऊ शकते. मात्र अद्याप आम्ही तसा कोणताही निर्णय घेतलेला नाही. आम्ही भारतासोबत असलेले संबंध बिघडू इच्छित नाही. कारण भारत हा आमचा महत्त्वाचा सुरक्षा भागीदार देश आहे. बायडन प्रशासनाने अद्याप भारतावर निर्बंध घालण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही. मात्र तसा निर्यण घेतल्यास रशियाकडून क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली खरेदी करण्यासाठी भारतासमोरील अडचणीत वाढ होऊ शकते.
दरम्यान यापूर्वी देखील संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत रशियाविरोधात प्रस्ताव मांडण्यात आला होता. या प्रस्तावात युद्ध बंदीची मागणी करण्यात आली होती. या प्रस्तावाच्या बाजुने अकरा सदस्यांनी मतदान केले तर तीन देश तटस्थ राहिले होते, यामध्ये भारत चीन आणि युएईचा समावेश होता. आता पुन्हा एकदा भारताने तटस्त राहण्याची भूमिका स्विकारली आहे.