पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी रविवारी इस्लामाबादस्थित पाश्चात्य दूतांवर संतापल्याची बातमी समोर आली आहे. या दूतांनी इम्रान खान यांना गेल्या आठवड्यात युक्रेनमधील रशियाच्या कृतींचा निषेध करण्यासाठी पाकिस्तानला आग्रह केला होता. यावर संतापलेल्या इम्रान खान यांनी ‘पाकिस्तान तुमचा गुलाम आहे का?,’ असा सवाल केला आहे.
युरोपियन युनियनच्या सदस्य राष्ट्रांसह २२ राजनैतिक मिशनच्या प्रमुखांनी १ मार्च रोजी संयुक्त पत्र जारी करून युक्रेनवर रशियाच्या आक्रमणाचा निषेध करणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेतील ठरावाला पाठिंबा देण्याचे पाकिस्तानला आवाहन केले होते. यासंदर्भातील पत्र सार्वजनिक करण्यात आलं होतं. युरोपियन युनियने घेतलेल्या मतदानात पाकिस्तान जो पाश्चात्य देशांचा पारंपारिक मित्र राष्ट्र म्हणून ओळखला जातो, तो मतदानापासून दूर राहिला. या महासभेत संयुक्त राष्ट्र महासभेने युक्रेनवर आक्रमण केल्याबद्दल रशियाला जोरदार फटकारले होते.
यानंतर संतापलेल्या इम्रान खान यांनी एका सार्वजनिक यावर प्रतिक्रिया दिली. “तुम्हाला आमच्याबद्दल काय वाटते? आम्ही तुमचे गुलाम आहोत का… तुम्ही जे बोलाल ते आम्ही करू, असं तुम्हाला वाटतं का?”, असे सवाल एका सभेला संबोधित करताना इम्रान खान यांनी उपस्थित केले. एनडीटीव्हीनं यासंदर्भात वृत्त दिलंय.
“मला युरोपियन युनियनच्या राजदूतांना विचारायचे आहे, की तुम्ही भारताला असे पत्र लिहिले आहे का?” असा सवालही इम्रान खान यांनी केला. तसेच अफगाणिस्तानातील पाश्चात्य नाटोला पाठिंबा दिल्याने पाकिस्तानला त्रास सहन करावा लागला आणि कृतज्ञतेऐवजी टीकेला सामोरे जावे लागले, असेही खान म्हणाले.
“आम्ही रशियाचे मित्र आहोत, आणि आम्ही अमेरिकेचेही मित्र आहोत; आम्ही चीन आणि युरोपचे मित्र आहोत; आम्ही कोणत्याही कॅम्पमध्ये नाही. पाकिस्तान तटस्थ राहिल आणि जे युक्रेनमधील युद्ध संपवण्याचा प्रयत्न करीत आहेत, त्यांच्यासोबत काम करेल,” अशी भूमिका त्यांनी मांडली.