उत्तर प्रदेशचे निकाल (Uttar Pradesh) जाहीर झालेत. सत्ताधारी निश्चित झालेत. सपा, काँग्रेस यांच्या प्रतिक्रियाही आल्यात. पण आता लक्ष लागलंय ते योगीच्या मंत्रिमंडळाकडे. योगींच्या मंत्रिमंडळात कोण असणार, (Yogi Adityanath) कुणाला डावलणार याच्या चर्चा सुरु झाल्यात. बरं मागच्या वेळेस भाजपानं योगींसोबत दोन उपमुख्यमंत्रीही केलेले होते, त्यातलेच एक कालच्या निवडणुकीत पराभूत झालेत. त्यांचं नाव केशव प्रसाद मौर्य. (Keshav Prasad Maurya) शेवटपर्यंत मौर्या टक्कर देत राहीले पण अखेर त्यांचा पराभवच झाला. त्यानंतर त्यांच्या सीराथू मतदारसंघात वादही उसळला. काही काळ काऊंटींग थांबवावी लागली होती. पण पराभव थांबवू शकले नाहीत. त्यामुळे त्यांची जागा कोण घेणार याचीही चर्चा रंगतेय?
कोण आहेत केशव प्रसाद मौर्य?केशव प्रसाद मौर्य यांच्याच नेतृत्वाखाली 2017 साली भाजपानं उत्तर प्रदेशात मोठं यश संपादन केलं. सत्तेत आले. त्याच वेळेस ते मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्येही होते. पण शेवटी लॉटरी लागली ते योगी आदित्यनाथ यांना. जातीचं समिकरण सांभाळण्यासाठी नॉन ठाकूर, नॉन यादव फेस म्हणून मौर्य यांना उपमुख्यमंत्री केलं गेलं. आता पुन्हा 2022 ची निवडणूक कुणाच्या नेतृत्वाखाली लढायची याचीही भाजपात चर्चा सुरु झाली त्यावेळेसही केशव प्रसाद मौर्य यांचं नाव पुन्हा आघाडीवर आलं. भाजपा कर्नाटक, उत्तराखंड अशा राज्यात मुख्यमंत्री बदलायला लागले त्यावेळेस उत्तर प्रदेशातही रिप्लेसमेंट होणार याची चर्चा रंगली. त्यावेळेस केशव प्रसाद मौर्यच मुख्यमंत्री होणार म्हणून त्यांच्या समर्थकांनी अंदाज बांधले. पण अखेर मौर्य यांनाच स्पष्टीकरण द्यावं लागलं. पण मौर्य यांचा कालच्या निवडणुकीत पराभव झाला आणि भाजपातला एक कलह आपोआपच निकाली लागला. महाराष्ट्रात फडणवीस विरुद्ध पंकजा मुंडे असा वाद पुन्हा नेटकऱ्यांना आठवला. ज्याप्रमाणं पंकजा मुंडेंना पराभूत केलं गेलं तसच काहीसं केशव प्रसाद मौर्य यांच्या बाबतीतही घडल्याची चर्चा सुरु आहे. केशव प्रसाद मौर्य यांचा पराभव पल्लवी पटेल यांनी केलाय ज्या अनुप्रिया पटेल यांच्या बहिण आहेत. अनुप्रिया पटेल यांचा अपना दल हा भाजपचा सहकारी पक्ष आहे.
केशव प्रसाद मौर्यच्या जागी कोण?
केशव प्रसाद मौर्य नसतील तर मग आता उपमुख्यमंत्री कोण होणार? बरं उपमुख्यमंत्री पद तर निर्माण केलं जाणार की नाही याचीही चर्चा आहे. कारण यावेळेस योगींच्या नावावर निवडणूक लढवली गेलीय आणि ती त्यांनी जिंकून दाखवलीय. त्यामुळे मागच्या वेळेस पक्ष श्रेष्ठींनी सांगितलं म्हणून दोन उपमुख्यमंत्री केले गेले. यावेळेस तसं होईल की नाही याबाबत जाणकार साशंकता व्यक्त करतायत. पण एक निश्चित भाजपचे सध्याचे उत्तर प्रदेश प्रदेशाध्यक्ष स्वतंत्रदेवसिंह यांचं मात्र प्रमोशन केलं जाईल अशी शक्यता वर्तवली जातेय. त्यांना एखाद्या महत्वाचं खात्याची बक्षिसी दिली जाण्याची शक्यता आहे. तसच माजी आयएएस अधिकारी आणि पंतप्रधान मोदींचे विश्वासू मानले गेलेले ए.के. शर्मा यांनाही महत्वाचं खातं दिलं जाऊ शकतं. स्वतंत्रदेव सिंग हे कुर्मी समाजातून येतात तर ए.के.शर्मा हे भूमीहार आहेत.