पाच राज्यातील दणदणीत पराभवाच्या आघातानंतर अखेर काँग्रेसमध्ये मंथन सुरू झाले आहे. काँग्रेसच्या कार्यकारी समितीची (CWC) आज संध्याकाळी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्या उपस्थितीत बैठक होणारय. मात्र, त्यापू्र्वी त्यांनी काँग्रेस संसदीय दलाची (CPP) बैठक बोलावलीय. या बैठकीत संसद अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्राबाबत चर्चा होणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे दुसरे सोमवारी सुरू होतेय. हे अधिवेशन 8 एप्रिलपर्यंत चालेल. या अधिवेशनात पक्ष म्हणून पुढे काय भूमिका घ्यायची याबाबत या बैठकीत चर्चा होणारय. आज रविवारी साडेदहा वाजता ही बैठक सुरू होणार होती. मात्र, ही बैठक सकाळी दहा वाजता सुरू झाल्याचे समजते. बैठकीला सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खारगे, आनंद शर्मा, के. सुरेश आणि जयराम रमेश आदी नेते दिल्लीत 10 जनपथ निवासस्थानी पोहचले आहेत. बैठकीबाबत के. सुरेश म्हणाले की, सोमवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे दुसरे सत्र सुरू होणार आहे. त्याबाबत रणनीती ठरवण्यासाठी यावेळी चर्चा होईल. पंजाबमध्ये काँग्रेसने सत्ता गमावली. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरमध्ये पराभवाचा मोठा आघात सहन करावा लागला. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या दोन बैठका एकाच दिवशी होत आहेत. त्यात पुढील रणनीतीवर चर्चा केली जाईल.
जी 23 नेते आक्रमक
काँग्रेसच्या पराभवानंतर जी 23 गटाच्या अनेक नेत्यांची शुक्रवारीही चर्चा झाल्याचे वृत्त आहे. यात पक्ष म्हणून पुढे काय भूमिका घ्यायची, यावर मंथन झाले. सकाळची बैठक संपल्यानंतर दुपारी चार वाजता कार्यकारी समितीची बैठक होणारय. या बैठकीत जी 23 गटाचे प्रमुख नेते गुलाब नबी आझाद आणि आनंद शर्मा सहभागी होणार आहेत. त्यामुळे यावेळी पक्षांतर्गत बदल आणि पराभवाचे उत्तरदायित्व ठरवण्याची मागणी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मात्र, पक्षाचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ही शक्यता फेटाळून लावलीय.
पुढे काय होणार?
उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसच्या प्रभारी महासचिव प्रियांका गांधी यांच्या नेृतत्वात पक्षाने निवडणूक लढवली. प्रियांकांनी स्वतः माध्यमांसोबत बोलताना आपण मुख्यमंत्री पदाचा चेहरा असल्याचे सांगितले. मात्र, 403 जागांपैकी काँग्रेसने फक्त 2 जागांवर विजय मिळवला. त्यांच्या बहुतांश उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले. यापूर्वी 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत पक्षाला सलग दुसऱ्यांदा पराभवाचा सामना स्वीकारावा लागल्यामुळे राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. सोनियांनी तूर्तास पदभार सांभाळला आहे. मात्र, आता पुढे काय होणार याची चर्चाय.