जागतिक कोविड-19 प्रकरणांमध्ये घट झाल्याच्या काही आठवड्यांनंतर आता पुन्हा एकदा करोना महामारीने जागतिकस्तरावर डोकं वर काढल्याचं दिसून येत आहे. चीन आणि दक्षिण कोरिया सारखे देश दररोज कोविड -19 प्रकरणांच्या बाबतीत नवीन उच्चांक गाठत आहेत, जे मुख्यतः ओमायक्रॉन व्हेरिएंटद्वारे वाढत आहेत. शिवाय अमेरिकेतही निर्बंध पुन्हा लागू केले जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
२०२० मध्ये वुहानमध्ये सुरुवातीच्या उद्रेकानंतर चीन सध्या स्थानिक पातळीवर पसरलेल्या कोविड-19 प्रकरणांच्या सर्वात मोठ्या लाटेशी लढत आहे. तसेच, आज (शनिवार) चीनमध्ये दोन करोनाबाधित रूग्णांच्या मृत्यूची देखील नोंद झाली आहे. जानेवारी २०२१ नंतर करोना रुग्णांच्या मृत्यूच्या संख्येत झालेली ही पहिली वाढ आहे.
चीनमध्ये शनिवारी सामुदायिक संक्रमणातून २ हजार १५७ नवीन करोनाबाधितांची नोंद झाली, ज्यामध्ये बहुसंख्य जिलिन प्रांतात आढळले आहेत. तर जिलिन प्रांतात करोना संक्रमणाचा प्रसार रोखण्यासाठी प्रवासावर निर्बंध लादण्यात आले आहेत आणि लोकांना प्रवास करण्यासाठी पोलिसांची परवानगी घेणे देखील आवश्यक केले आहे.
दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचे मुख्य वैद्यकीय सल्लागार डॉ. अँटोनी फौसी यांनी इशारा दिला आहे की, रूग्ण संख्येत वाढ होत गेल्यास अमेरिकेत लवकरच पुन्हा एकदा निर्बंध लावले जाऊ शकतात. ओमायक्रॉनच्या BA.2 या सब व्हेरिएंटमुळे संसर्गाचे प्रमाण वाढू शकते, असेही त्यांनी म्हटले आहे.
चीन, दक्षिण कोरिया आणि आफ्रिकेतील काही देशांमध्ये करोनाने हाहाकार माजवला आहे. या देशांमध्ये अचानक रुग्णसंख्या वाढू लागल्याने आरोग्य सुविधा अपुऱ्या पडू लागल्या आहेत. करोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटमुळे या देशांमधील रुग्णसंख्या वाढल्याचं आरोग्य तज्ज्ञांचं म्हणणं आहे. दरम्यान, इतर देशांच्या तुलनेत भारताने ओमायक्रॉन व्हेरियंटमुळे आलेली करोनाची लाट योग्यरित्या हाताळल्याचं आकडेवारीतून समोर आलंय.