पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये पक्षाला दारूण पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा पक्षनेतृत्वाविषयी चर्चा सुरू झाली आहे. जी-२३ गटानं गांधी कुटुंबीयांनी नेतृत्वापासून दूर राहावं, अशी देखील मागणी केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि जी-२३ गटाचे सदस्य गुलाम नबी आझाद यांनी शुक्रवारी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. या भेटीमध्ये जी-२३ गटाच्या मागण्या आणि काँग्रेस पक्षाच्या पुढील वाटचालीविषयी चर्चा झाल्याचं गुलाम नबी आझाद यांनी बैठकीनंतर सांगितलं. मात्र, यावेळी त्यांनी काँग्रेस पक्षाध्यक्षपदाविषयी देखील सूचक विधान केलं.
सोनिया गांधींसोबत झालेल्या चर्चेनंतर जी-२३ गटाच्या सदस्यांचं समाधान झाल्याचं चित्र निर्माण झालेलं असताना आता नेमकी काँग्रेसची पुढची भूमिका काय असेल, याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. गुलाम नबी आझाद यांनी सोनिया गांधी यांच्यासोबत झालेल्या भेटीनंतर व्यक्त केलेल्या भूमिकेवरून पुढील निवडणुकीत काँग्रेसला नवीन अध्यक्ष मिळण्याची शक्यता व्यक्त होऊ लागली आहे.
गुलाम नबी आझाद यांनी यावेळी बोलताना पक्षात कुणालाही सोनिया गांधींच्या अध्यक्षपदाविषयी आक्षेप नसल्याचं म्हटलं आहे. “काँग्रेसच्या नेतृत्वाविषयी कोणताही आक्षेप नाही. जेव्हा सोनिया गांधींनी अध्यक्षपदावरून पायउतार होण्याची तयारी दर्शवली, तेव्हा आम्ही सगळ्यांनीच त्यांना अध्यक्षपदी कायम राहण्याची विनंती केली”, असं गुलाम नबी आझाद म्हणाले आहेत.
“काही महिन्यांत पक्षाध्यक्षपदाच्या निवडणुका होणार आहेत. त्या वेळी कार्यकर्तेच ठरवतील की कुणी अध्यक्ष व्हावं आणि कुणी नाही. त्या वेळी याबाबत चर्चा करता येईल. आत्ता निवडणुका होणार नाहीयेत. शिवाय पक्षाध्यक्षपद देखील सध्या रिक्त नाही. जेव्हा सोनिया गांधींनी त्यांच्या पदाचा राजीनामा देण्याची तयारी दाखवली, तेव्हा काँग्रेसमधल्या सर्वच गटांनी त्यांना अध्यक्षपदी कायम राहण्यास विनंती केली. त्यांच्या अध्यक्षपदाबाबत आक्षेप नाही. पण पक्षातील कार्यपद्धती अधिक चांगली करण्यासाठी काही सूचना मात्र आहेत”, असं देखील गुलाम नबी आझाद म्हणाले.
“काँग्रेस पक्षाला अधिक मजबूत कसं करता येईल, यावर चर्चा करण्यासाठी सोनिया गांधी वेगवेगळ्या नेत्यांच्या भेटी घेत आहेत. आम्ही जिथे जिथे पराभूत झालो आहोत, तिथल्या पराभवाची काय कारणं आहेत यावर चर्चा झाली. थोडक्यात पुढील येणाऱ्या निवडणुकांसाठी संघटितपणे काँग्रेस पक्ष कसा सामोरा जाईल, याविषयी चर्चा झाली”, असं देखील गुलाम नबी आझाद म्हणाले.