रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी फेब्रुवारी महिन्यामध्ये त्यांच्या सेवेत असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची बदली केलीय. आपल्यावर विषप्रयोग केला जाईल या भीतीने पुतिन यांनी सर्व कर्मचाऱ्यांची नव्याने भरती केल्याचं सांगितलं जात आहे. मात्र पुतिन यांनी त्यांच्या सेवेत असणारी ही कर्मचाऱ्यांची बदली युक्रेनमध्ये युद्ध सुरु झाल्यानंतर करण्यात आली की आधी याबद्दल स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. काही बातम्यांनुसार पुतिन यांनी कामावरुन काढून टाकलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये स्वयंपाकी, कपड्यांनी इस्त्री करणारे लॉण्ड्री बॉइज आणि सुरक्षारक्षकांचा समावेश आहे.युक्रेनमधील गुप्तहेर खात्याच्या हवाल्याने डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार मॉस्कोमधील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माध्यमातून विषप्रयोग करण्याचा कट रचून हा अपघात असल्याचं भासवण्यात येणार होतं. “रशियामधील प्रभावशाली व्यक्तींनी आता पुतीन यांना मार्गामधून बाजूला काढण्यासाठी हलचाली सुरु केल्या आहेत. पुतिन यांच्यानंतर कोण यासंदर्भातील नाव निश्चित झालंय,” असा दावा डेली मेलमधील वृत्तात सुत्रांच्या हवाल्याने करण्यात आलाय.
२४ फेब्रुवारीपासून युक्रेनविरोधात पुतिन यांनी युद्धाची घोषणा केली. या युद्धाला आज एक महिना झाला असून या कालावधीमध्ये अमेरिका, पाश्चिमात्य राष्ट्र, ऑस्ट्रेलिया, जापान यासारख्या देशांबरोबरच युरोपियन राष्ट्र संघामधील देशांनीही रशियावर बहिष्कार घालत निर्बंध लादलेत. त्यामुळे रशियाच्या अर्थव्यवस्थेची परिस्थिती फारच चिंताजनक झालीय. याच कारणामुळे अधिक आर्थिक पडझड होऊ नये म्हणून प्रभावशाली व्यक्तींना पुतिन यांचा काटा काढण्याचा कट रचल्याचा दावा वृत्तात करण्यात आलाय.
युक्रेनने केलेल्या दाव्यानुसार फेड्रल सिक्युरिटी सर्व्हिसेसचे निर्देशक असणारे ७० वर्षीय अलेक्झांडर बोर्टनिकोव्ह हे पुतिन यांच्याविरोधात कट रचणाऱ्या अधिकाऱ्यांपैकी एक आहेत. अलेक्झांडर बोर्टनिकोव्ह आणि पुतिन यांनी केजीबी या रशियन गुप्तहेर संस्थेसाठी यापूर्वी एकत्र काम केलं आहे. नुकताच या दोघांमध्ये मोठा वाद झाल्याची चर्चा रशियामध्ये आहे.
युक्रेनमधील गुप्तहेर खात्याने मुद्दाम या बातम्या पेरल्याची शक्यताही व्यक्त केली जातेय. रशियन नेतृत्वाबद्दल संभ्रम निर्माण करण्याच्या उद्देशाने या बातम्या पेरल्याची शक्यता व्यक्त केली जात असली तर पुतिन यांच्या खासगी आयुष्यामध्ये अशाप्रकारच्या घटनांची शक्यात यापूर्वी अनेकदा व्यक्त करण्यात आलीय. पुतिन यांच्यासंदर्भातील अनेक गोष्टींबद्दल आजही रहस्य कायम आहे. अनेकांनी तर पुतिन यांना एका गंभीर आजाराने ग्रासल्याची शक्यताही व्यक्त केलीय.