नवी दिल्ली : भाजपने ज्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले, असे नेते भाजपमध्ये गेल्यावर त्यांच्या विरोधातील ‘ईडी’ची कारवाई थांबते. भ्रष्टाचारी नेते भाजपमध्ये गेल्यावर स्वच्छ होतात का, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. कोणाही विरोधात कारवाई करताना पंतप्रधान मोदींनी भेदभाव करू नये, असे सुळे म्हणाल्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी संपूर्ण देश भ्रष्टाचारमुक्त करणार असतील तर त्यांच्या धोरणाचे स्वागत करता येईल; पण काही जणांविरोधात (चेरी पिकिंग) जाणीवपूर्वक छापे टाकले जात असतील तर त्याचा विरोध केला पाहिजे. सक्तवसुली संचालनालय (ईडी) वा अन्य तपास यंत्रणांची कृती योग्य नाही, असे म्हणावे लागते. ‘ईडी’चे छापे टाकायचे असतील तर सगळय़ा पक्षांच्या नेत्यांवर टाका, भाजपच्या विरोधातील पक्षनेत्यांवरच कारवाई केली जाते, असाही प्रश्न सुळे यांनी पत्रकारांशी बोलताना उपस्थित केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या ठाण्यातील मालमत्तांवर ईडीने मंगळवारी कारवाई केली. भाजपविरोधातील पक्षनेते व त्यांच्या कुटुंबीयांना ‘ईडी’सारख्या तपास यंत्रणाच्या माध्यमातून राजकीय त्रास दिला जात असल्याचा आरोप महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्षांच्या नेत्यांनी केला आहे. देशाच्या सुरक्षेची काळजी करावी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रश्नपत्रिका फुटली तरी त्याची चौकशी केली जाते, मग इथे तर ईडी, सीबीआय या तपास यंत्रणा कुणावर छापे टाकणार आहेत ही माहिती आधीच काही लोकांना कशी समजते? या यंत्रणा स्वतंत्रपणे काम करू शकत नाहीत असा निष्कर्ष काढता येतो, असे सुळे म्हणाल्या.