Share Market : सकाळी शेअर बाजाराची चांगली सुरुवात झाली. आशियाई बाजारात असलेले सकारात्मक वातावरण आणि मंगळवारी अमेरिकन शेअर बाजारात असलेली तेजी याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून आला. रशिया-युक्रेन युद्ध थांबण्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्याचाही परिणाम शेअर बाजारावर दिसून येत आहे.
सेन्सेक्स 419.2 अंकांच्या उसळणीसह 58362 अंकांवर सुरू झाला. तर, निफ्टी निर्देशांक 142.85 अंकांनी वधारून 17468.15 अंकावर खुला झाला. ऑटो, रिअल इस्टेट, मीडिया या क्षेत्रातील शेअर वधारले आहेत.
निफ्टी 50 मधील 45 शेअरमध्ये तेजी दिसत आहे. तर, पाच शेअरमध्ये घसरण दिसत आहे. बँक निफ्टी 261 अंकांनी वधारला. सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 650 अंकांनी तर निफ्टी 170 अंकांनी वधारला होता. सेन्सेक्स 58, 580 अंकावर, तर निफ्टी 17496 अंकावर ट्रे़ड करत होता.
कोणत्या क्षेत्रात तेजी
मेटल आणि ऑइल-गॅस हे क्षेत्र वगळता इतर सर्व क्षेत्रात तेजी दिसून आली आहे. रिअलटी इस्टेटमध्ये 1.47 टक्के, मीडिया सेक्टरमध्ये 1.27, ऑटो क्षेत्र 1.14 टक्क्यांनी वधारले आहेत. त्याशिवाय बँक, एफएमसीजी, आयटी, फार्मा आणि वित्तीय सेवांचे शेअर्स वधारले आहेत.
प्री-ओपनिंगमध्ये बाजार
प्री-ओपनिंगमध्ये सेन्सेक्समध्ये तेजी दिसून आली. सेन्सेक्स 419.20 अंकांनी वधारत 58,362 अंकावर व्यवहार करत होता. निफ्टीदेखील 142.85 अंकांवर व्यवहार करत होता.
मंगळवारीदेखील तेजी
आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात तेजी कायम राहिली. मंगळवारी शेअर बाजार सुरू झाला तेव्हा बाजारात खरेदी होत असल्याचे दिसून आले. त्यानंतर व्यवहाराच्या शेवटच्या सत्रात तेजी कायम राहिली. मंगळवारी शेअर बाजारातील व्यवहार संपले तेव्हा सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांक वधारले होते. मंगळवारी, सेन्सेक्स 350.16 अंकांवर म्हणजे 0.61 टक्क्यांच्या तेजीसह 57,943.65 अंकांवर बंद झाला. तर, निफ्टी निर्देशांकात 103.30 अंकांनी वधारत 17,325.30 अंकांवर बंद झाला.