इस्लामाबाद : नुकत्याच केलेल्या रशियाच्या दौऱ्यामुळे आणि रशियन अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांची भेट घेतल्याने जगातील बलाढय़ देश पाकिस्तानवर नाराज असून त्यांनी भारताला पाठिंबा द्यायला सुरुवात केली आहे, असे पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांनी शुक्रवारी इस्लामाबादमधील सुरक्षा विभागाच्या बैठकीत सांगितले.
कोणत्याही देशासाठी स्वतंत्र परराष्ट्र धोरण महत्त्वाचे आहे. आम्ही स्वतंत्र निर्णय घेतले कारण ते राष्ट्रहितासाठी महत्त्वाचे होते, असे इम्रान खान म्हणाले. अमेरिकेचे नाव न घेता इम्रान म्हणाले, काही बलाढय़ देश आमच्यावर नाराज आहेत, कारण आम्ही रशियाचा दौरा केला. त्यांनी रशियाकडून तेल आयात करणाऱ्या भारताला पाठिंबा दिला आहे, असे इम्रान यांनी सांगितले.