संयुक्त राष्ट्रे : रशियाचे सैनिक युक्रेनमध्ये नागरिकांवर अत्याचार करीत असून हे अत्याचार दुसऱ्या महायुद्धात करण्यात आलेल्या अत्याचारांहून अधिक क्रूर आहेत. तेव्हा झालेल्या युद्धगुन्हेगारीपेक्षाही रशियाचे आताचे गुन्हे अधिक गंभीर आहेत, अशी तक्रार युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत बैठकीत मंगळवारी केला. झेलेन्स्की यांनी केलेले युक्रेनमधील युद्धगुन्हेगारीचे वर्णन हे अत्यंत व्यथित करणारे असून त्याची नि:ष्पक्ष चौकशी करावी, या मागणीस आमचा पाठिंबा आहे, अशी भूमिका भारतातर्फे या बैठकीत मांडण्यात आली.
सुरक्षा परिषदेला झेलेन्स्की हे उपस्थित राहिल्याबद्दल भारताने त्यांना धन्यवाद दिले. झेलेन्स्की यांनी बैठकीत सांगितले की, युक्रेनची राजधानी कीव्हपासून सुमारे ३० किलोमीटरवर असलेल्या बुचा शहरात रशियाने सैनिकांनी नरसंहार घडविला आहे. आता हे शहर पुन्हा युक्रेनच्या ताब्यात आले आहे. तेथे रशियाच्या सैनिकांनी सुमारे तीनशे नागरिकांना ठार केल्याची या शहराच्या महापौरांची तक्रार आहे. झेलेन्स्की यांनी संयुक्त राष्ट्रांत बाजू मांडताना दावा केला की, रशियाच्या सैनिकांनी या शहरात घुसल्यानंतर तेथे जे कोणी आमच्या देशाच्या बाजूने उभे राहिले त्यांना ठार केले. घराबाहेर आलेल्या महिला मदतीसाठी ओरडत असताना त्यांनाही ठार करण्यात आले. अनेक महिलांवर त्यांच्या मुलाबाळांच्या पुढेच बलात्कार करून ठार करण्यात आले. रस्त्यात वाहनांत जे नागरिक होते, त्यांना रशियाच्या रणगाडय़ांनी चिरडून ठार केले. रशियाने केलेले हे गुन्हे दुसऱ्या महायुद्धातील क्रौर्यापेक्षाही भयंकर आहेत. आमच्या देशातील विविधतेतील एकतेला मोडून काढण्याचा प्रयत्न रशिया करीत आहे, असा आरोप झेलेन्स्की यांनी केला.
संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत गेल्या वेळी युक्रेनवर चर्चा झाली होती. तेव्हापासून आतापर्यंत तेथील परिस्थितीत फारशी सुधारणा झालेली नाही. सुरक्षेची स्थिती ढासळली आहे. तेथील मानवी प्रश्नही चिंताजनक आहेत. बुचामधील नरसंहारचा भारत निषेध करतो.
-टी. एस. तिरुमूर्ती, भारताचे संयुक्त राष्ट्रांतील कायम प्रतिनिधी राजदूत