श्रीलंकेतील आर्थिक स्थितीप्रमाणे राजकीय समस्याही दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. श्रीलंकेचे अध्यक्ष गोतबया राजपक्षेंच्या आघाडी सरकारने श्रीलंकेच्या संसदेतील बहुमत गमावले आहे. कालच राजपक्षेंनी आपले बंधू बासिल राजपक्षेंना हटवून नेमलेले नवे अर्थमंत्री अली साबरी यांनी एका दिवसातच राजीनामा दिला.
श्रीलंकेत निर्माण झालेल्या अभूतपूर्व आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी चौकटीबाहेरचे, अपारंपरिक, कल्पक आणि सक्रिय उपाय करावे लागतील, असे साबरी यांनी राजीनामा देताना सांगितले. आपण ३ एप्रिलला न्यायमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता, तेव्हा इतर कोणतेही पद घेण्याचा माझा इरादा नव्हता, असेही त्यांनी स्पष्ट केले.
श्रीलंकेत आणीबाणी लागू केल्यानंतर प्रथमच मंगळवारी श्रीलंका संसद सभागृहाचे कामकाज सुरू झाल्यानंतर अध्यक्ष राजपक्षे यांच्या सरकारने बहुमत गमावले. रॉयटरने दिलेल्या वृत्तानुसार राजपक्षे कुटुंबाविरुद्ध नागरिकांत वाढत्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर ४१ संसद सदस्यांनी राजपक्षे यांची सत्ताधारी आघाडी सोडण्याचा निर्णय घेऊन सभात्याग केला.
दरम्यान, राजपक्षे यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यास नकार दिला. मात्र, संसदेत जो पक्ष बहुमत सिद्ध करू शकेल, त्याच्याकडे सरकारची सूत्रे देण्याचे त्यांनी मान्य केले. सत्ताधारी आघाडी अल्पमतात आली असली तरी अद्याप सभागृहात मतदान घेण्यात आलेले नाही. अपक्ष सदस्यांच्या पािठब्याशिवाय सरकारी प्रस्ताव सभागृहात मंजूर होणे सध्याच्या परिस्थितीत कठीण दिसत आहे.
पंतप्रधानांच्या निवासस्थानाजवळ आंदोलन
पंतप्रधान महिंदूा राजपक्षे यांच्या निवासस्थानापाशी सोमवारी दोन हजार निदर्शक जमले व त्यांनी महिंदूा राजपक्षेंच्या राजीनाम्यासाठी जोरदार निदर्शने केली. या निदर्शकांनी पोलिसांनी लावलेले अडथळे तोडले. त्यांना नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केला. देशभर हिंसक आंदोलने सुरू असून, राजधानी कोलंबोच्या स्वातंत्र्य चौकासह किमान सहा संसद सदस्यांच्या घरासमोर निदर्शकांनी ठिय्या मारला असून, निदर्शने सुरू आहेत.