रशिया आणि युक्रेनदरम्यान सुरु असणाऱ्या युद्धाला ४० दिवसांहून अधिक काळ लोटला आहे. बूचा शहरामधील हत्याकांडानंतर पाश्चिमात्य देशांनी पुन्हा एकदा रशियाविरोधात निर्बंधांची घोषणा करण्यास सुरुवात केलीय. अमेरिकेनेही नुकत्याच जारी केलेल्या नव्या निर्बंधांमध्ये राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या दोन्ही मुलींवर आर्थिक निर्बंध लादलेत. व्हाइट हऊसने पुतिन यांच्या दोन्ही मुलींबरोबरच रशियातील मोठे नेते आणि अनेक बँकांबरोबरच उद्योजकांवरही निर्बंध लादलेत. अमेरिकेने रशियातील मोठ्या सरकारी आणि खासगी बँकांवरही निर्बंध लादलेत
व्हाइट हाऊसने पुतिन यांच्या दोन्ही मुली, मारिया वोरोत्सोवा आणि कॅटरीना तिखोनोवा यांच्यावर निर्बंध लादले आहेत. पुतिन यांना ल्यूडमिला शक्रेबनेवा या पहिल्या पत्नीपासून या दोन मुली आहेत. अमेरिकेने पहिल्यांदाच थेट पुतिन यांच्या कुटुंबियांवर अशाप्रकारे निर्बंध लादले आहेत.
व्हाइट हाऊसचं म्हणणं काय?अमेरिकेने रशियावरील निर्बंधांमध्ये वाढ केली असून रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावारोवा आणि रशियाच माजी राष्ट्राध्यक्ष दमित्री मेदवेदेव तसेच पंतप्रधान मिखाइल मिशुस्तिन यांच्यासहीत रशियन सुरक्षा परिषदेतील सदस्यांवरही निर्बंध लागू करण्यात आलेत. “या लोकांनी रशियन लोकांच्या जीवावर स्वत:ला समृद्ध केलं. यापैकी काही लोकांनी युक्रेनविरोधात युद्ध लादण्यासाठी पुतिन यांच्या पाठीशी होते,” असं व्हाइट हाऊसने म्हटलंय.
बँकांवरही निर्बंध…व्हाइट हाऊने जारी केलेल्या पत्रकामध्ये असंही म्हटलं आहे की रशियातील सर्वात मोठी सरकारी बँक सब्र बँक आणि खासगी बँक असणाऱ्या अल्फा बँकेवर पूर्णपणे बंदी घालण्यात आलीय. या दोन्ही बँकांच्या माध्यमातून आता अमेरिकेमध्ये कोणत्याही पद्धतीची गुंतवणूक करता येणार नाहीय.
आजही निर्बंध जाहीर होणार…व्हाइट हाऊसने पुढे अधिक निर्बंध लादणार असल्याचे जाहीर केलं आहे. आज रशियामधील सरकारी कंपन्या आणि संस्थांवर निर्बंध लादले जाणार असल्याचं सांगण्यात आलंय. या कंपन्यांवर निर्बंध लादण्याचा हेतू हाच आहे की जगभरामध्ये असणारी या कंपन्यांची अर्थव्यवस्था कोलमडली पाहिजे. रशियाविरोधात पुन्हा पाश्चिमात्य देश आक्रमकपणे भूमिका घेण्यामागे बूचा येथील हत्याकांड जबाबदार असल्याचं सांगितलं जातंय.
कारण काय?एका वरिष्ठ अमेरिकी अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार पुतिन बरीचशी संपत्ती त्यांच्या कुटुंबियांच्या नावे आहे. यामुळेच आता आम्ही त्यांच्या कुटिंबियांवर निर्बंध लादत आहोत. पुतिन यांना आर्थिक दृष्ट्या एकटं पाडण्यासाठी अमेरिकेचे प्रयत्न सुरु असून त्यांच्या मुलींवर लादण्यात आलेले हे निर्बंध त्याचाच एक भाग आहे. या निर्बंधांमुळे आता पुतिन यांच्या मुलींना अमेरिका किंवा अमेरिकी कंपन्यासोबत कोणाताही आर्थिक व्यवहार करता येणार नाहीय.
बायडेन काय म्हणाले?राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी या निर्बंधांना त्या पुराव्यांशी जोडलंय ज्यात रशियन सैनिकांनी किव्हच्या शेजारच्या बूचा शहरात मुद्दाम सर्वसामान्यांच्या हत्या केल्याचं उघड झालंय. बूचामधील घटनेनंतर अमेरिकन राष्ट्राध्यक्ष चांगलेच संतापलेत. बायडेन यांनी एका ट्विटमध्ये लिहिलं आहे की, “मला हे स्पष्टपणे सांगायचं आहे की बूचामधील मानवी हत्याकांडांची मोठी किंमत रशियाला मोजावी लागेल.”