केरळच्या त्रिशूर जिल्ह्यातील इरिंजलकुडा येथील कूडलमणिक्यम मंदिरात एका भरतनाट्यम नृत्यांगणेला ती हिंदू नसल्याचं कारण देत एका कार्यक्रमातून वगळण्यात आल्याच्या दोन आठवड्यानंतर आता, प्रसिद्ध भरनाट्यम नृत्यांगना मानसिया वीपी आज(सोमवार) सीपीआय(एम)च्या युवक आघाडी असणाऱ्या डीवायएफआय तर्फे आयोजित एका कार्यक्रमांतर्गत मंदिर शहरात नृत्य सादर करणार आहे.
”मी एक कलाकाराच्या रुपात सादरीकरण करत आहे, मंदिरात माझ्या सादरीकरणास जागा नाकारल्याच्या निषेध म्हणून नाही. पण डीवायएफआयला समाजाला एक संदेश द्यायचा आहे की कलेचा कोणताही धर्म नसतो.” असं मानसियाने म्हटलं आहे.
भरतनाट्यममधील पीएचडी रिसर्च स्कॉलर असलेल्या मानसियाला याआधी मुस्लिम म्हणून जन्माला आलेली आणि लहानाची मोठी झालेली असूनही शास्त्रीय नृत्याची कला सादर केल्याबद्दल इस्लामिक धर्मगुरूंच्या संतापाचा आणि बहिष्काराचा सामना करावा लागला होता.