कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यतील कडक टाळेबंदी रविवारी मध्यरात्रीपासून शिथिल केली जाणार आहे. राज्य शासनाने लागू केलेली टाळेबंदी सोमवारपासून लागू करण्यात येणार आहे. याबाबत प्रशासकीय पातळीवरील हालचाली सुरू झाल्या आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यतील वाढता करोना संसर्ग लक्षात घेऊन शनिवारी मध्यरात्री (१६ मे) पासून कडक टाळेबंदी सुरू करण्यात आली आहे. आठवडाभरात करोना रुग्णसंख्येत काहीशी घट झाली आहे. मात्र मृत्युदर अजूनही कमी होत नाही. यामुळे कडक टाळेबंदी महिनाअखेपर्यंत सुरू राहणार असल्याची चर्चा सुरू होती. तर, ग्राहक, उद्योजक, व्यापारी यांच्याकडून टाळेबंदीत काही प्रमाणात सवलत द्यावी अशी मागणी होत आहे. जिल्हा बाजार समिती आठवडाभर बंद असल्याने व्यवहार ठप्प आहेत. भाजीपाला विक्रीवर याचा परिणाम झाला आहे. भाजीपाला साठा संपल्याने ताजा भाजीपाला मिळावा यासाठी नागरिकांचे प्रयत्न सुरू आहेत. व्यापारी, उद्योजक सोमवारपासून व्यवहार सुरू ठेवणार असल्याचे कोल्हापूर जिल्हा चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे यांनी म्हटले आहे.
या सर्व परिस्थितीचा आढावा घेऊन टाळेबंदीबाबत पालकमंत्री सतेज पाटील यांच्याशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहे. जिल्हा प्रशासनाच्या पातळीवर सुरू असलेल्या हालचाली पाहता राज्य शासनाच्या टाळेबंदीचे नियम जिल्ह्यला लागू होतील. सकाळी काही काळ व्यापार, व्यवहार सुरू राहण्याची चिन्हे आहेत.