देशातील करोना परिस्थिती कायम आहे. रुग्णांची संख्या कमी होत असल्याचं आकडेवारीतून दिसत असलं, तरी अद्यापही देशात साडेतीन लाखांच्या जवळपास रुग्ण दररोज आढळून येत आहेत. तर मृत्यू संख्येचा आलेख मात्र चार हजारांच्या मागे पुढेचं सरकताना दिसत असून, देशातील करोनामुळे होत असलेल्या मृत्यूचं वादळ अद्याप कायम आहे. गेल्या २४ तासांतील मृतांची आकडेवारीही चिंताजनक आहे. तर दिवसभरात आढळून आलेल्या रुग्णांपेक्षा करोनावर मात करणाऱ्यांची संख्या जास्त असल्याने तितकीच एक बाब देशासाठी दिलासा देणारी ठरली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून गेल्या २४ तासांतील आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे. भारतात काल दिवसभरात तीन लाख २६ हजार ९८ नवीन करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर तीन लाख ५३ हजार २९९ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. मृत्यू संख्येच्या सरासरीत कोणतीही घट होताना दिसत नाही. गेल्या काही दिवसांपासून दररोज चार हजारांच्या आसपास मृत्यूंची नोंद होत आहे. देशातील एकूण मृतांची संख्या दोन लाख ६६ हजार २०७ वर पोहोचली आहे. तर सध्या देशात ३६ लाख ७३ हजार ८०२ रुग्ण उपचार घेत आहेत.
देशात झालेल्या एकूण ३८९० मृत्यूंपैकी ६९५ रुग्ण महाराष्ट्रातील आहेत. तर कर्नाटकात ३७३ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. सध्या महाराष्ट्रातील रुग्णसंख्या कमी होताना दिसत असून, देशात सर्वाधिक रुग्णसंख्येत कर्नाटक अग्रस्थानी आहे. कर्नाटकात करोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे.
कर्नाटकात मागील २४ तासांत ४१ हजार ७७९ रुग्ण आढळून आले आहेत. तर महाराष्ट्रात ३९ हजार ९२३ नवीन रुग्ण आढळले आहेत. या दोन्ही राज्यांबरोबरच केरळमध्ये ३४ हजार ६९४, तामिळनाडू ३१ हजार ८९२, आंध्र प्रदेश २२ हजार १८ रुग्ण आढळून आले आहेत. देशातील एकूण रुग्णसंख्येपैकी ५२.२२ टक्के रुग्ण या पाच राज्यांमधील आहेत.