ग्रामीण भागांत फैलाव : बाधितांचे प्रमाण २० ते ३० टक्क्यांपर्यंत
मुंबई, पुणे आदी मोठय़ा शहरांमध्ये करोनाचा प्रादुर्भाव कमी होत असला तरी पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाडय़ातील ग्रामीण भागांत मात्र या विषाणूचा विळखा वाढत आहे. या भागांत बाधितांचे प्रमाणही सुमारे २० ते ३० टक्के आहे.
दुसऱ्या लाटेत सुरूवातीला मुंबई, पुण्यात मोठय़ा प्रमाणावर फैलावलेला करोना आता राज्यातील ग्रामीण भागांत पसरला आहे. पश्चिम महाराष्ट्रात गेल्या आठवडय़ाच्या तुलनेत या आठवडय़ात सोलापूर आणि सांगली जिल्ह्य़ातील ग्रामीण भागांत सर्वाधिक म्हणजे १३ टक्के रुग्णवाढ झाली आहे. त्याखालोखाल सातारा (८ टक्के), कोल्हापूर (१० टक्के) रुग्णसंख्या वाढली आहे.
कोकणातही करोनाचा फैलाव वाढला असून, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये गेल्या आठवडय़ाच्या तुलनेत १० टक्कय़ांनी रुग्णसंख्या वाढली आहे. मराठवाडय़ात सर्वाधिक म्हणजे ११ टक्के रुग्णवाढ उस्मानाबादमध्ये नोंदवली गेली. त्याखालोखाल बीडमध्ये ९ टक्के तर औरंगाबाद, परभणीमध्ये ६ टक्कय़ांनी रुग्णवाढ झाली आहे.
झपाटय़ाने झालेली रुग्णवाढ, मर्यादित सार्वजनिक आरोग्य व्यवस्था यांमुळे या विभागांमध्ये खाटा मिळविण्यासाठी रुग्णांना पायपीट करावी लागत असून, अनेक रुग्ण मुंबईकडे धाव घेत आहेत.
अमरावती ग्रामीणमध्ये पुन्हा रुग्णवाढ
अमरावतीतील करोना संसर्गाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढला आहे. आठवडाभरात रुग्णसंख्येत १५ टक्कय़ांनी वाढ झाली आहे. मृतांची संख्याही १३ टक्कय़ांनी वाढली आहे.
पहिल्या लाटेच्या तुलनेत पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाडय़ात दुसऱ्या लाटेत अधिक करोनाप्रसार होत असल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे. पहिल्या लाटेत सातारा, सांगली, कोल्हापूर येथे सुमारे दहा हजार रुग्ण बाधित झाले होते. दुसऱ्या लाटेत हे प्रमाण अनुक्रमे १०९ टक्के, ४८ आणि ५८ टक्कय़ांनी वाढले. सोलापूरमध्ये पहिल्या लाटेत सुमारे साडेसात हजार रुग्णांना बाधा झाली होती, तर दुसऱ्या लाटेत ही संख्या १५७ टक्कय़ांनी वाढली. कोकणात रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये अनुक्रमे तीन हजार आणि १३०० रुग्ण आढळले होते. दुसऱ्या लाटेत मोठय़ा प्रमाणात संसर्ग प्रसार झाला असून हे प्रमाण सुमारे २५० टक्कय़ांनी वाढले आहे. मराठवाडय़ात पहिल्या लाटेच्या तुलनेत सर्वाधिक २६४ टक्कय़ांनी रुग्णवाढ बीडमध्ये झाली आहे. याखालोखाल जालना, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांचा समावेश आहे.
कोल्हापूरमध्ये मृत्यूवाढ
राज्यात सर्वाधिक मृतांची संख्या सध्या कोल्हापूर जिल्ह्य़ात असून, गेल्या आठवडय़ाच्या तुलनेत कोल्हापूरमध्ये ५३ टक्कय़ांनी मृत्यूसंख्येत वाढ झाल्याचे दिसते. एका आठवडय़ात कोल्हापूर ग्रामीणमध्ये ८४४ मृत्यू झाले आहेत. त्याखालोखाल बीड (२४ टक्के) सोलापूर (२० टक्के), सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी (१६ टक्के), औरंगाबाद (१५टक्के) मृतांची संख्या वाढली आहे. राज्याच्या एकूण मृत्यूदरातही वाढ झाली असून हा दर १.५० टक्क्यांवरून १.५६ टक्कय़ांवर गेला आहे.
बाधितांचे प्रमाण साताऱ्यात सर्वाधिक : राज्यात बाधितांचे सर्वाधिक प्रमाण साताऱ्यात (३२ टक्के) आहे. त्याखालोखाल परभणी (२७ टक्के), उस्मानाबाद (२६ टक्के), रत्नागिरी (२२ टक्के), सिंधुदुर्ग (२४ टक्के), सांगली (२१ टक्के) आहे.
देशात रुग्णघट, पण मृत्यूवाढ
नवी दिल्ली : देशाची दैनंदिन रुग्णसंख्या सलग सातव्या दिवशी तीन लाखांखाली नोंदवली गेली. गेल्या २४ तासांत देशात २ लाख ४० हजार रुग्ण आढळले, तर ३,७४१ रुग्णांचा मृत्यू झाला. नव्या रुग्णांमध्ये घट नोंदविण्यात येत असली तरी मृतांमधील वाढ कायम आहे. देशातील एकूण करोनाबळींची संख्या तीन लाखांच्या (२,९९,२६६) उंबरठय़ावर आहे.
राज्यात २६,६७२ नवे रुग्ण
मुंबई : राज्यात गेल्या २४ तासांत करोनाचे २६,६७२ रुग्ण आढळले असून, ५९४ रुग्णांचा मृत्यू झाला. दिवसभरात मुंबईत १४२७, रायगड ७५०, पुणे शहर ७८६, उर्वरित पुणे जिल्हा १६४४, पिंपरी-चिंचवड ६२७, नगर १७१६, नाशिक शहर ४२५, सातारा २००८, सोलापूर १५४८, रत्नागिरी ९२०, अमरावती ८७२, नागपूर शहर ३२६, उर्वरित नागपूर जिल्हा ६७१ नवे रुग्ण आढळले. राज्यात सध्या ३ लाख ४८ उपचाराधीन रुग्ण आहेत.