देशमुख १०० कोटी वसुली प्रकरण : मुंबईतील पाच बार मालकांना ईडीचे समन्स

राज्याचे माजी गृहमंत्री आणि चराष्ट्रवादीचे  नेते अनिल देशमुख यांच्या मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गंभीर आरोप केला होता. सचिन वाझे आणि पोलीस दलातील इतर दोघांना देशमुख यांनी १०० कोटी वसुलीचे टार्गेट दिले होते, असं सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पाठवलेल्या पत्रात म्हटलं होतं. आर्थिक गैरव्यवहारामुळे या प्रकरणाचा तपास सक्त वसुली संचालनालयाने सुरू केला असून, आता मुंबईतील पाच बार मालकांना समन्स बजावण्यात आलं आहे. दरम्यान, अंधेरीतील एका बार मालकांकडून वाझेंना अडीच लाख रुपये दिले जात होते आणि ते परमबीर सिंगाना याची माहिती द्यायचे अशी माहितीही समोर आली आहे.

टाईम्स ऑफ इंडियाने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. या प्रकरणाचा तपास करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला दिला होता. त्यानंतर या प्रकरणात ईडीनेही तपास सुरू केला. काही दिवसांपूर्वीच ईडीने गुन्हा नोंदवून अनिल देशमुख यांच्या घराची झाडाझडती घेतली होती. त्यानंतर आता मुंबईतील पाच बार मालकांना समन्स बजावण्यात आलं आहे.

याप्रकरणात ईडीने अंधेरीतील एका बार मालकाची चौकशी केल्याची माहिती समोर आली आहे. बार मालक सचिन वाझेंना सेवेत असताना महिन्याला अडीच लाख रुपये द्यायचा. नंतर वाझेंना मार्च महिन्यात अटक करण्यात आली आणि नंतर बडतर्फही करण्यात आलं.

याची माहिती वाझे थेट तत्कालिन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना देत होते, अशीही माहिती आता समोर आली आहे. या प्रकरणी आता ईडीने मुंबईतील आणखी पाच बार मालकांना चौकशीसाठी समन्स बजावले आहे. हे पाचही बार मालक त्रास दिला जाऊन नये म्हणून वाझेंना महिन्याला अडीच लाख रुपये देत होते अशी माहिती चौकशीत समोर आली आहे. परमबीर सिंगांनी १०० कोटी वसुलीचं टार्गट दिल्याचा आरोप केल्यानंतर ईडीने या आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपाची चौकशी सुरू केली. सचिन वाझे, अनिल देशमुख यांच्यासोबत गैरव्यवहारात असलेल्यांची चौकशी सध्या ईडीकडून केली जात आहे.

Comments : 0


    No Comments

Leave a comment