राज्यात करोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक कमी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर शनिवारी मध्यरात्रीनंतर महाराष्ट्र सरकारने अनलॉकची घोषणा करणारा आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार अनलॉकसाठी पॉझिटिव्ही रेट आणि उपलब्ध ऑक्सिजन बेडची स्थिती यावरून ‘अनलॉक’चे पाच गट तयार करण्यात आले आहेत. ७ जूनपासून हे आदेश लागू होणार असले तरी या आदेशांमधील आकडेमोड आणि निकषांमुळे संभ्रमावस्था निर्माण झालीय. राज्याची राजधानी असणाऱ्या मुंबईमध्ये अनलॉकसंदर्भात व्यापारी आणि प्रशासन आमने-सामने आल्याचं चित्र दिसत आहे. नव्या नियमांनुसार मुंबई पहिल्या किंवा दुसऱ्या गटात मोडत असल्याचा दावा व्यापाऱ्यांनी केलाय तर प्रशासनाने मात्र मुंबई पहिल्या प्रकारात असल्याचं म्हटलं आहे.
अनलॉकच्या नव्या नियमांनंतर आपलं शहर कोणत्या गटात येतं यासंदर्भात ठरवण्याचा अधिकार स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यात आलाय. मुंबईचा समावेश कोणत्या गटात यावरुन प्रशासन आणि व्यापाऱ्यांमध्ये गोंधळ. प्रशासन आणि व्यापाऱ्यांकडून उलटसुलट दावे केले जात आहेत. मुंबईचा समावेश नेमका कोणत्या गटात होतो याबद्दल संभ्रम असल्याचं कळतंय. मुंबई सध्या आकडेवारीनुसार तिसऱ्या गटात आहे पण व्यापाऱ्यांनी पहिल्या गटात असल्याचा दावा केलाय. पॉझिटिव्ही रेट आणि उपलब्ध ऑक्सिजन बेड्सच्या संख्येनुसार राज्य सरकारने जिल्ह्यांची विभागणी करण्यासाठी आणि निर्बंध कसे असावेत यासंदर्भातील गट तयार केले आहेत.
नक्की वाचा >> Maharashtra Unlock: लग्नसमारंभ, हॉटेल, मॉल, प्रायव्हेट ऑफिसेस… कुठे काय सुरु काय बंद जाणून घ्या
आकडेवारीबद्दल संभ्रम काय?
सध्याच्या आकडेवारीनुसार मुंबईचा पॉझिटिव्हिटी रेट ५.५७ टक्क्यांच्या आसपास आहे. ही आकडेवारी तीन जूनची आहे. मात्र चार तारखेची आकडेवारी पाच टक्क्यांच्या खाली आहे, असा व्यापाऱ्यांचा दावा आहे. चार तारखेच्या आकडेवारीच्या जोरावर मुंबई पहिल्या गटात असल्याचा व्यापाऱ्यांचा दावा असल्याने व्यापारी संघटना संभ्रमावस्थेत दिसत आहेत.
व्यापाऱ्यांचं म्हणणं काय आहे?
जोपर्यंत मुंबईच्या आयुक्तांकडून काही आदेश येत नाही तोपर्यंत प्रतिक्रिया देणं घाईचं ठरेल असं मत मुंबई व्यापारी संघटनेचे नेते विरेन शाह यांनी एबीपी माझाशी बोलताना व्यक्त केलं. बेड आणि ऑक्सिजनसंदर्भातील आकडेवारी पाहिली तर मुंबई दुसऱ्या प्रकारात मोडते. तीन जूनची आकडेवारी पाहिलं तर मुंबई तिसऱ्या गटात आहे आणि चार जूनची पाहिली तर पहिल्या गटात आहे. त्यामुळे या आकडेवारीनुसार मुंबई अगदी बॉर्डर लाइनवर आहे असं म्हणता येईल, असं मत शाह यांनी व्यक्त केलं.
नक्की वाचा >> Maharashtra Unlock: नव्या नियमांमध्ये e Pass संदर्भातही मोठे बदल; अनेक जिल्ह्यांना दिलासा तर काही ‘जैसे थे’
गटांनुसार काय फरक पडणार?
दुसऱ्या गटात असू तर दिवसभर दुकाने सुरु ठेवता येतील, तिसऱ्या गटात असल्यास चार वाजेपर्यंतच दुकानं उघडी ठेवता येणार आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम असून प्रत्येक ठिकाणची महानगरपालिकाच हा संभ्रम दूर करु शकते, असा विश्वास शाह यांनी व्यक्त केला. स्थानिक प्रशासनाच्या आदेशाची आम्ही वाट पाहतोय.
स्थानिक प्रशासनाच्या आदेशाची वाट पाहतोय
संभ्रम दूर करण्यासाठी आम्ही चर्चा करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आम्हाला स्थानिक प्रशासनाकडून येणाऱ्या अधिकृत आदेशाची वाट पाहण्यास सांगण्यात आलं. आज किंवा उद्या संध्याकाळपर्यंत स्थानिक प्रशासन माहिती देईल अशी अपेक्षा आहे. मात्र लवकरात लवकर संभ्रम दूर केल्यास व्यापाऱ्यांच्या आणि सर्वसामान्यांच्या फायद्याचं ठरेल अशी आशा शाह यांनी व्यक्त केली.
नक्की वाचा >> Maharashtra unlock : तुमचा जिल्हा कोणत्या गटात; काय असतील निर्बंध?
राज्यामध्येही गोंधळच
नवीन नियमांनुसार सध्या महाराष्ट्रातील जिल्हे आणि शहरांमध्ये कोणते निर्बंध लागू करायचे यासंदर्भात संभ्रम दिसून येत आहे. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारीच पुणे, पिंपरी-चिंचवडसंदर्भातील निर्णय सोमवारी घेतला जाईल हे स्पष्ट केलं आहे. मात्र राज्यातील इतर ठिकाणी शहरांचा आणि जिल्ह्यांचा पॉझिटिव्हिटी रेट वेगवेगळा असल्याने संभ्रमावस्था कायम आहे. सातारा शहर आणि सातारा जिल्हा पॉझिटिव्हिटी रेट वेगळा आहे. अशी परिस्थिती अनेक ठिकाणी आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था काय निर्णय घेणार, आपलं शहर जिल्हा कोणत्या गटात मोडतो हे ठरवणार यावर निर्बंधांबद्दल स्पष्टता येणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हीटी रेट जास्त आहे.